मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देणा-या राजकीय पक्षाची माहिती देण्यास प्रतिबंध 

त्रयस्थ पक्षाच्या खाजगी बाबीत आगंतुक हस्तक्षेप करील अशा वैयक्तिक तपशीलाची माहिती देण्यास प्रतिबंध आहे.

Prohibition of disclosure of political party contributing to CM Assistance Fund
मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देणा-या राजकीय पक्षाची माहिती देण्यास प्रतिबंध 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहायता निधीत भरीव आर्थिक मदतीचे आवाहन करत असतात. पण राजकीय पक्ष कदाचित या आवाहनाला प्रतिसाद देतो किंवा नाही? याबाबत माहिती मागितली असता राजकीय पक्षाच्या योगदानाची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष माहिती देण्यास उत्सुक नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने स्पष्ट कळविले आहे की, त्रयस्थ पक्षाच्या खाजगी बाबीत आगंतुक हस्तक्षेप करील अशा वैयक्तिक तपशीलाची माहिती देण्यास प्रतिबंध आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 15 मे 2020 रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे कोविड अंतर्गत राजकीय पक्षाच्या योगदानाची माहिती मागितली होती. जन माहिती अधिकारी मिलिंद काबाडी यांनी कळविले की त्रयस्थ पक्षाच्या खाजगी बाबीत आगंतुक हस्तक्षेप करील अशी वैयक्तिक तपशीलाची माहिती देण्यास प्रतिबंध आहे. सदर माहिती संकलित केली जात नाही तसेच या कामासाठी साधन सामुग्री मोठ्या प्रमाणात वळवावी लागेल. मुख्यमंत्री सहायता निधीत अश्या प्रकारचे रोज व्यवहार होत असून विवरणपत्रात UTR क्रमांक निहाय माहिती दिलेली असते त्यामुळे देणगीदारांची नावे शोधून देणे शक्य नाही. अनिल गलगली यांनी 1 जून 2020 रोजी दाखल केलेल्या प्रथम अपिलावर 9 नोव्हेंबर 2020 रोजी अपील सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सहायक संचालक असलेल्या प्रथम अपिलीय अधिकारी सुभाष नागप यांनी कोणताही दिलासा दिला नाही.

अनिल गलगली यांच्या मते कोविड अंतर्गत राजकीय पक्षाने दिलेली माहिती ना पंतप्रधान केयर निधी देत नाही ना मुख्यमंत्री सहायता निधी. राजकीय पक्षाची माहिती त्रयस्थ असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री सचिवालयाने संबंधित राजकीय पक्षाना पत्र पाठविण्याची तसदी घेतली नाही. आता मुख्यमंत्री उद्धच ठाकरे यांनी संबंधित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.