मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे । सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीचे दिवशी भरता येणे शक्य व्हावे याकरता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे व प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसेच महापालिकी प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र 1 जानेवारीपासून 31 मार्च 2023 पर्यंत या कालावधीतील सर्व शनिवार तसेच सार्वजनिक सुट्टीचे दिवशी (7 मार्च 2023 रोजी धुलिवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यत व रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यत कार्यान्वित राहणार आहेत.

महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरुन पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन पध्दतीद्वारे मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम प द्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करु शकतील. तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.