मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 05 फेब्रुवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देत मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शिर्डीमध्ये बाहेरच्या राज्यातील भाविकांची वाढती गर्दी पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्यासाठी आता विमानतळावर नवीन इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. (Property tax relief for Mumbaikars, expansion of Shirdi airport; Decision of Cabinet meeting)
हेही वाचा… Nashik Loksabha: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा? ठाकरे-पवार आमनेसामने
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सरकार दोन लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असल्याचे सांगत सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे 20 निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय…
- मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही (नगरविकास विभाग)
- राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. (कौशल्य विकास विभाग)
- ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार. (सामाजिक न्याय विभाग)
- राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार. (नगर विकास विभाग)
- उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार. (वन विभाग )
- मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी देणार. (उद्योग विभाग)
- पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी. (वन विभाग)
- बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार, मूलभूत सुविधा देणार. (ग्राम विकास विभाग)
- शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी. (सामान्य प्रशासन विभाग)
- धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार. (गृहनिर्माण विभाग)
- सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते. (विधि आणि न्याय विभाग)
- स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता. (जलसंपदा विभाग)
- बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार. (सहकार विभाग)
- कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग)
- तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार. (जलसंपदा विभाग)
- नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम. (महसूल विभाग)
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार. (सामान्य प्रशासन विभाग)
- कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष. ( कृषी विभाग)
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.(पशुसंवर्धन विभाग)