जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव आता महाविद्यालयातच स्विकारले जाणार

नाशिक : जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करतांना विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे लवकरात लवकर मिळावीत याकरीता महाविद्यालयांमध्येच जात पडताळणीची अर्ज प्रक्रीया पार पाडण्याचे आदेश पालकमंत्री दादा भूसे यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेला दिले. बारावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्रे प्राधान्याने देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत येणार्‍या विविध अडचणी सोडविण्यासाठी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो. यामूळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची शक्यता असते. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया आणि ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतची ही बैठक घेण्यात आली. समाज कल्याण विभागात दोन वर्षांपासून जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढा असे आदेश यावेळी देण्यात आले. महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी आवश्यक ठरते. त्यामुळे प्राधान्याने बारावी व अकरावीतील विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा अशा सूचना भूसे यांनी दिल्या. जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध व्हावी व ती तेथून पार पाडली जावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामूळे विद्यार्थी अकरावी – बारावीत असतानाच महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. समाज कल्याण विभागाकडे जात पडताळणीची दोन हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती यावेळी भुसे यांनी दिली.