महाराष्ट्रातील गुंतवणुकींचे संरक्षण करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

eknath shinde

मुंबई – राज्यातील भूमिपुत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणुकींचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे. त्यांनी भाजपच्या कुटील डावाला बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केले.

हेही वाचा – नव्या पिढीला कॉग्रेसचा इतिहास सांगा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन येथील उद्योजकांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी मुंबईत रोड शो केला. योगी यांनी उद्योजकांसह बॉलिवूड निर्माते यांची भेट घेऊन चर्चा केली. योगींच्या या दौऱ्यावर विरोधी पक्षाने टीका केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही योगींच्या मुंबई भेटीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योग आणि बॉलिवूड पळविण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ज्या बैठका त्यांनी घेतल्या त्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे व्हिजन सांगितले. परंतु ही सर्व उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी भाजपची रणनीती आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘तुम्ही कितीही आंदोलनं करा, पण…’; अमोल मिटकरींची पुन्हा राज्यपालांवर टीका

गुजरातची विधानसभा निवडणूक होती, त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले आणि गुजरातमध्ये सरकार आणले. आताही लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातून उद्योग उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भाजप रचत आहे. या डावाला हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावे, असे आवाहन तपासे यांनी केली.

हेही वाचा – गुलाम नबी आझादांना काँग्रेसचा दणका, १७ नेते स्वगृही परतले