Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जिल्हयाला रुग्णसंख्येनुसार रेमडेसिवीरचा साठा द्या

जिल्हयाला रुग्णसंख्येनुसार रेमडेसिवीरचा साठा द्या

पालकमंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेमडेसिवीरचा साठा अत्यंत कमी येत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. रूग्णसंख्येच्या निकषानूसार रेमडेसिवीर मिळणे आवश्यक आहे त्यामुळे रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्याला इंजेक्शन वितरण करावे अशी मागणी जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क करून केली आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी दररोज दहा हजार रेमडेसिवीरची मागणी असतांना नाशिकला केवळ ४५० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरूपात म्हणजेच जवळपास १६०० हून जास्त इंजेक्शनचा दररोज पुरवठा केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या या शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक असतांना नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत असल्याचे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपासाठी राज्यस्तरावरून रुग्णसंख्या विचारात घेऊन सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र नाशिकला रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जात असलेला साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांचे नावे देण्याबाबत सदर कंपनीचे अधिकारी यांना सूचित करण्यात यावे तसेच नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिविरचा साठा सुरळीत करून हा अन्याय आपण दूर करावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

- Advertisement -

नाशिकवर अन्याय होउ देणार नाही : ठाकरे
केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशोबाने तसे वाटप सुद्धा सुरू करण्यात आले. मात्र स्टोकिस्टने वाढीव रेमडेसिवीरचा साठा दिलाच नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी साठा मिळाला मात्र मी यात लक्ष घालून नाशिकवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वासन दिले आहे.

- Advertisement -