उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज खेडमध्ये; कोणावर साधणार निशाणा?

ठाकरे गटाची जाहीर सभा आज खेडमध्ये होणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे सभाघेणार आहेत. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला असल्याने या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Public meeting of Uddhav Thackeray in Khed

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता तोच गट खरी शिवसेना म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गट चांगलाच अस्वस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसात स्वतः उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. या मुद्द्यामुळे राजकारण तापलेले असतानाच आता उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा होणार आहे. खेडच्या गोळीबार मैदानावर संध्याकाळी पाच वाजता ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार आणि आपल्या ठाकरे शैलीतून कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांची आजची सभा ही शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते भावुक झाले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे कदमांच्या बालेकिल्ल्यात जाऊन नेमका काय बोलतात? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. तर रामदास कदम यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी बांधकाम सभापती विश्वास कदम हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आजच्या या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आज या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी ठाकरे गटाचे आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार आणि सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे हे आज खेडचा देखील दौरा करणार आहेत. सकाळी ९.३० वाजता ते खेडसाठी रवाना होणार आहेत. खेडमध्ये ते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर ११.३० पासून ते खेडमधील तसेच कोकणातील इतर भागातील उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – ठाकरेंचे खासदार बंडू जाधव यांचा पक्षाला घरचा आहेर; म्हणाले ‘…यामुळे शिंदेची बंडखोरी’