पुणे : पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. पण, अलीकडे पुण्यात घडणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांवरून ‘क्राइमचे माहेर’घर अशी ओळख पडत चालली आहे. आता पुण्यात एका व्यक्तीनं पत्नीच्या गळ्यावर चाकूनं वार करून तिची निर्दयीपणे हत्या केली आहे. ही घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे हत्येनंतर याचा व्हिडिओ संबंधित व्यक्तीनं काढला आहे. त्यात त्याचा लहान मुलगाही दिसत आहे.
ज्योती शिवदास गिते ( वय 28, रा. तुळजाभवानीनगर, खराड ), असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवदास तुकाराम गिते ( वय, 37 ), असं आरोपीचं नाव आहे. आरोपी शिवदास याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील रहिवाशी आहे. तो न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे. बुधवारी पहाटे पत्नी ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ज्योतीचा आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजाऱ्यांनी ज्योतीच्या घराकडे धाव घेतली. तेव्हा, ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ज्योतीची हत्या केल्यानंतर शिवदासनं एक व्हिडिओ बनवला. यात शिवदास पत्नीकडून धोका होता, असं म्हणत आहे. तसेच, या व्हिडिओत शिवदास आणि ज्योतीचा मुलगा खुर्चीवर बसून सगळा प्रकार पाहत होता.
व्हिडिओत शिवदास काय म्हणतोय?
“माझी लक्ष्मी होती. पण, मला मारण्याचा प्रयत्न केला, हे फार उशीरा कळलं. हीचे लक्षणे बरोबर नव्हती. मी पण माणूसच आहे. माझ्या संरक्षणासाठी मला वाईट करण्याची वेळ आली. हिला मारण्याची माझी इच्छा नव्हती. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मला मारण्याचा प्रयत्न करती? माझ्या मुलाचं भविष्य पाहण्यासाठी मला हिला मारावे लागले. माझा नाईलाज होता. कुठलाही पर्यायच ठेवला नव्हता माझ्यासमोर… मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. हीने पुण्यात माणसे सुद्धा पेरली आहेत… 100 टक्के पेरलेली आहेत. भांडी घासण्याच्या कामाला जात होती की प्लॅन करण्यासाठी जात होती… यात लेकराचा काय गुन्हा आहे… त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला असेल… मी आजपर्यंत कोणताही गुन्हा केला नाही. मला मजबूर करण्यात आले,” असं शिवदास व्हिडिओत म्हणताना दिसतोय.