Homeमहाराष्ट्रPune : आमदार होताच हत्तीवरून काढली मिरवणूक, पण आलं अंगलट; नेमकं काय...

Pune : आमदार होताच हत्तीवरून काढली मिरवणूक, पण आलं अंगलट; नेमकं काय प्रकरण?

Subscribe

विधानसभेतील विजयानंतर हत्तीवरून मिरवणूक काढणं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदाराला महागात पडलं आहे. आमदार शंकर मांडेकर यांची मिरवणूक हत्तीवरून काढण्यात आली. या मिरवणुकीवेळी हत्तीवरुन पेढे वाटण्यात आले. मात्र, हत्तीवरून मिरवणूक काढल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झालं.

पुणे : विधानसभेतील विजयानंतर हत्तीवरून मिरवणूक काढणं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदाराला महागात पडलं आहे. आमदार शंकर मांडेकर यांची मिरवणूक हत्तीवरून काढण्यात आली. या मिरवणुकीवेळी हत्तीवरुन पेढे वाटण्यात आले. मात्र, हत्तीवरून मिरवणूक काढल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झालं. त्यामुळे प्रकरणी वन विभागाने शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. (pune forest department filed case against ncp ajit pawar mla shankar mandekar due to procession on elephant photo video viral)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर – वेल्हा – मुळशी मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंकर मांडेकर यांची रविवारी पिरंगुट गावात मिरवणूक काढण्यात आली होती. मांडेकर आमदार बनल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी सांगलीवरुन हत्ती मागवला होता. मांडेकर आमदार झाले यासाठी या हत्ती वरुन पेढे वाटण्यात आले. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेत आमदार आणि त्यांच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

शंरक मांडेकरांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांची हत्तीवर मिरवणूक काढली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत असल्याने वन विभागाने कारवाई केली. मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे, त्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जिथे आहे, त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shankar Mandekar (@shankar_mandekar)

आमदार शंकर मांडेकर यांनी या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. “उरवडे – आंबेगाव – बोतरवाडी – मारणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हत्तीवरून मिरवणूक काढत प्रेम व्यक्त केले. भोर – राजगड – मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे, आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी, चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे 125 किलो पेढे वाटले. या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय – बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो”, असे आमदार शंकर मांडेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


हेही वाचा – Satara News : अजितदादांच्या ‘NCP’त पुन्हा प्रवेश करण्यापूर्वीच संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या घरावर ‘इन्कम टॅक्स’ची रेड