पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळ जुना बाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. जुना बाजार चौकात एका होर्डिंगचा मोठा लोखंडी खांब खाली उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे.
आईवर अंत्यसंस्कार करून परदेशी कुटुंब परत येत असताना दुर्दैवाने या रिक्षावर होर्डिंग कोसळले. या घटनेत वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
पुणे होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला असून ११ लोक गंभीर जखमी आहेत. तर एकजण अतिदक्षता विभागात दाखल केलेला आहे. या भयानक दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. #Pune pic.twitter.com/c2RnNPfpfE
— My Mahanagar (@mymahanagar) October 5, 2018
पुण्यातील जुना बाजार परिसरात जाहीरातीचे लोखंडी होर्डिंग्ज आज दुपारी कोसळले. याघटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शिवाजी परदेशी (वय ४०) यांच्या मृत्यूमुळे परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. शिवाजी परदेशी यांच्या पत्नीचे काल निधन झाले होते. त्यांच्या अस्थीचे विसर्जन करुन परदेशी कुटुंबीय आळंदी येथून परतत असताना शाहीर अमर शेख चौकात त्यांच्या रिक्षावर लोखंडी होर्डिंग कोसळले. या अपघातात परदेशी यांच्या मातोश्री रुक्मिणी, चार वर्षांचा मुलगा देवांश आणि १८ वर्षीय समृद्धी गंभीर जखमी झाले आहेत. एका दिवसात दोन्ही मुलांवरचे छत्र हरपल्यामुळे या घटनेबाबत सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे.