घरमहाराष्ट्रठाकरे, राऊतांवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

ठाकरे, राऊतांवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Subscribe

किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायर्‍यांवर सत्कार

पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. त्यालाच ठाकरे सरकारने कोविड सेंटरचा 100 कोटींचा ठेका देऊन पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत याच कंपनीला ४ ठेके दिले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांच्याही बेनामी कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पुण्यात केला.

किरीट सोमय्या यांचे पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले. ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महापालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी इथे भाषणही केले. ते म्हणाले, गेल्या शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता. ज्या कंपनीला कोविड सेंटरचे काम सरकारने दिले, त्या कंपनीची कधी नोंदणीच झालेली नाही. केईएम हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला एक चहावाला आहे, तो या कंपनीचा मालक आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या जनतेशी खेळ केला आहे. संजय राऊत यांच्या मित्राची ही कंपनी आहे, या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट देण्यात आले. पुणे महापालिकेने या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुंबईतल्या कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी या कंपनीच्या मालकाचे नाव सांगावे. कोविड सेंटर चालवताना जे गैरप्रकार झाले. त्यात जे लोक मृत्यूमुखी पावले, त्या कंपनीवर उद्धव ठाकरे गुन्हा दाखल करणार का? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले.

महापालिका आयुक्तांनी मान्य केले आहे की, कोविड कंपनी बोगस होती. त्यांनी 10 दिवसांच्या आत एक डॉक्टरही आणला नाही. अवघे १५ टक्के पेशंट आणण्यासही कंपनीला यश आले नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. महापालिका आयुक्तांनी पीएमआरडीएला पत्र लिहिले, की कंपनीला टर्मिनेट करा. पण पीएमआरडीएने ९ दिवस घेतल्याने आणखी ३ मृत्यू झाले. त्यानंतर पीएमआरडीएने लिहिले की ही कंपनी बोगस आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी या कंपनीला वरळी एनएससीआयचे कंत्राट दिले. त्यांनाच मुंबई महापालिकेने ७६ कोटींचे कंत्राट दिले. महापालिका आयुक्तांनी भेटी दरम्यान या कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले, असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

गोमुत्राने शुद्धीकरण
किरीट सोमय्यांच्या सत्कारानंतर काँग्रेसकडून मनपाच्या पायर्‍यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले. महापालिकेच्या पायर्‍यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करणे हे भाजपला योग्य वाटत असेल, तर ही पायरी आम्ही गोमूत्र आणि गुलाब पाण्याने धुवून शुद्ध केली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -