घरताज्या घडामोडीLok Sabha 2024: वाडेश्वर कट्ट्यावर रवींद्र धंगेकरांनी केलं मन मोकळं, म्हणाले- यापुढे...

Lok Sabha 2024: वाडेश्वर कट्ट्यावर रवींद्र धंगेकरांनी केलं मन मोकळं, म्हणाले- यापुढे निवडणुकीत…

Subscribe

पुणे – पुणे लोकसभेच्या निवडणुकीच मतदान दोन दिवसांपूर्वी (13 मे) झाले. या निवडणुकीत भाजप – महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेस – महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात होते. या तिघांनी जवळपास 50 दिवसाहून अधिक काळ शहराच्या अनेक भागात जाऊन प्रचार सभा, रॅली, पदयात्रा काढत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. तर या निवडणुकीचे मतदान होऊन दोन दिवस झाले असून याचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. पण त्याच दरम्यान पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षी प्रमाणे निवडणुकी पूर्वी आणि नंतर उमेदवारांचा वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले होते. यावेळी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित राहिले. इडली चटणी, शिरा खात दोघांनी निवडणुकीमधील आलेले अनुभव खेळीमेळीच्या वातावरणात सांगितले. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हे काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाही.

रविंद्र धंगेकर म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणूक ही भावनेवर किंवा जाती-धर्मावर झाली नाही. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक झाली. पुणेकरांनी विकासावर भर दिला. विविध पक्षांचे राजकीय नेते पुण्यात आले. त्यांच्या जाहीर सभा झाल्या, त्यांच्या भाषणातही विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. पुणेकर हे सुज्ञ आहेत. कोणी विकास केला आणि कोणी केला नाही, हे पुणेकरांनी मतपेटीच्या माध्यमातून सांगितले आहे. ते येत्या 4 जूनला सर्वांना कळेल.

- Advertisement -

वैयक्तिक टीका धंगेकरांच्या जिव्हारी…

पुणे लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराने एकमेंकावर वैयक्तिक टीका – टीप्पणी केली नाही, पण माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक टिका झाली, अशी खंत रवींद्र धंगेकरांनी वाडेश्वर कट्ट्यावर व्यक्त केली. ते म्हणाले की, या निवडणुकीत माझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. माझं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. माझ्यावर आणि कुटुंबावर वैयक्तिक टीका करण्यात आली. मात्र निवडणुकीत असे आरोप होतच असतात असे म्हणून मी खचून गेलो नाही. योग्य वेळी मी त्याबद्दल बोलेल असंही धंगेकर म्हणाले.

रवींद्र धंगेकरांनी लढवलेली ही दहावी निवडणूक होती. त्याबद्दल ते म्हणाले की, आतापर्यंत मी दहा निवडणुका लढवल्या पण कधीही विरोधी उमेदवाराच्या आयुष्यावर कधी घसरलो नाही. या निवडणुकीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पण हरकत नाही, मी काही कमवायला आलेलो नाही असे सांगत धंगेकर म्हणाले की मी काही शरद पवार किंवा विखे पाटलांच्या कुटुंबात जन्माला आलो नाही. जे काही मिळालं ते इथंच मिळालं आहे, आणि ते मी काही सोबत घेऊन जाणार नाही. पण या निवडणुकीत मोठं नुकसान झालं. वरच्या लेव्हलवरुन मला विविध नोटीसा आल्या, माझी कामं बंद पाडण्यात आली. माझ्या बद्दल या निवडणुकीत जे काही झालं ते लवकरच पुणेकरांसमोर आणणार आहे, ज्यांनी केलं त्यांनाही आरसा दाखवणार असाही निर्धार धंगेकरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यापुढे कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही – धंगेकर

ही माझी दहावी निवडणूक होती. जय-पराजय मी पाहिलेले आहेत. त्यामुळे हार-जीत काय होते, याची पर्वा नाही. पण या निवडणुकीतून एक बोध घेतला असे सांगत धंगेकर म्हणाले की, यापुढे आयुष्यात कधी निवडणूक लढवली तर मी कोण्याच्या घरावर, कुटुंबावर कधी बोलणार नाही, हे मी माझ्यापुरतं ठरवलं आहे. दोन दिवसांच्या निवडणुकीमुळं कोणचं घर उद्ध्वस्त होईल, कोणाचं घर जळताना पाहाण्याची वेळ येणार नाही, यासाठी कोणाच्या आयुष्यावर कधी बोलणार नाही, असेही धंगेकर यावेळी म्हणाले.

पुणे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वाटप झाल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. सहकार नगर पोलिस ठाण्यात त्यांनी ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर त्यांच्यासह 35 -40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : मतदान होताच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -