पुणे : स्थलांतरित मजुरांची यादी तयार; १५ हजार नागरिकांचा मार्ग मोकळा

पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार करण्यात आली असून १५ हजार नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.

Labours
स्थलांतरित मजुरांची यादी तयार; १५ हजार नागरिकांचा मार्ग मोकळा

देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले होते. त्यांना परत आपल्या गावी, आपल्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तेलंगणाच्या लिंगमपल्लीमधून झारखंडकडे पहिली ट्रेन या मजूर आणि कामगारांना घेऊन रवाना झाली. तर या पाठोपाठ आता पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १५ हजार नागरिकांचा समावेश आहे.

१५ हजार नागरिकांचा समावेश

पुण्यात गेल्या दीड महिन्यांपासून अनेक परप्रांतीय शहरातील विविध भागात अडकले होते. दरम्यान, पुणे जिल्हा प्रशासनाला ई – मेलद्वारे अनेक स्थलांतरित मजुरांनी घरी परतण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्या अर्जांची छाननी करुन पुण्यातील स्थलांतरिताची पहिली यादी तयार केली आहे. यात १५ हजार ५०२ मजुरांचा समावेश असून त्यांचा आता घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील जवळपास ४ हजार ०४८ आणि बिहारमधील ३ हजार ८१० नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या ५८३ नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे.

रेड झोनमध्ये असलेल्यांना अडचणी

बऱ्याच परप्रांतीयांना घरी परतण्यासाठी परवानगी असली तरी रेड झोनमधील परप्रांतीयांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या सर्व माहिती संकलित करण्यात येत असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून त्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


हेही वाचा – एसटीचे कारखाने-कार्यशाळा सुरु होणार