Pune Mini Lockdown : सायं ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी

मायक्रो कंटेनमेंट झोन आणखी कडक करणार

Pune mini lockdown night curfew during 6pm to 6 am and pmpl service remain closed for 7 day mission 100 day
Pune Mini Lockdown : सायं ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव आणि खासदार आमदार उपस्थित होते. पुण्यात लॉकडाऊन न लावता जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत पुण्यात पूर्णपणे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लग्न कार्याला ५० आणि अंत्ययात्रेसाठी २० जणांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. तसेच इतर सर्व कार्यक्रमांना पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे, पीएमपीएल बससेवा, हॉटेल पुढील ७ दिवस बंद राहणार आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठकीनंतर माहिती दिली आहे की, पुण्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. पुर्वी पुण्यामध्ये २७ टक्के पॉझिटिव्हिटी होती परंतु आता ३२ टक्के क्रॉस झाली आहे. दिवसाला ७ ते ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी दिवसभरात २९ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही भागात अधिक लक्ष देऊन कोरोना चाचण्यांमध्ये भर द्यायचा आहे. कोरोना रुग्णांचा वाढणारा आकडा चिंताजनक असल्यामुळे आरोग्य सुविधा बळकट, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

पुण्यात येत्या ५ तारखेपर्यंत सर्वाधिक बेड वाढवणार आहोत. कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढता राहिल्यास १०० टक्के कोव्हिड रुग्णालये घोषित करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा पुर्ण क्षमतेने काम करत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला शहरात हलवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील रुग्ण आता पुण्यामध्ये येत आहेत. कोल्हापूरमध्येही कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे.

मायक्रो कंटेनमेंड झोन आणखी कडक करणार

पुण्यातील नागरिकांना कमी त्रास झाला पाहिजे या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले आहेत. मायक्रो कंटेनमेंट झोन अजून कडक करण्यात येणार आहेत. कोरोनाबाधीत आढळलेल्या सोसायटींमध्ये निर्बंध लादण्यात येतील तसेत तेथील नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येणार आहे. जे रुग्ण होम क्वारंटाईन असतील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन तसेच त्यांचे पिरियॉडिक टेस्ट आणि ब्लड टेस्ट करण्यात येणार आहेत. सर्व रुग्णालयांवर प्रेशन ठेवून अधिकाधिक बेड निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. एका दिवसात ३०० बेडची वाढ केली आहे. असेच रोज बेड वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ४०० पॅरामेडिकल स्टाफ नियुक्त करण्यात आले असल्याची माहितीही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

रुग्णालयांचे बिल पुन्हा ऑडिट करण्यात येणार आहेत. कोरोना काळात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या त्यावेळी रुग्णालयांच्या बिलचे ऑडिट करण्यात येत होते. यानंतर आता पुन्हा पथक पुनर्गठीत करण्यात येणार आहे. पुन्हा नागरिकांच्या तक्रारी येण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे.

पुण्याला २० रुग्णवाहिका द्या – गिरीश बापट

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आला आहे. तसेच खासदार गिरीश बापट यांनी पुण्यासाठी २० रुग्णवाहिका देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासाठी ५०० रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे. यामधील २०० रुग्णवाहिका पुणे जिल्ह्याला द्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गिरीश बापट यांनी दिवसा हॉटेल आणि रेस्तरॉ बंद ठेवण्यावर आक्षेप घेतला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर लाठीमार नको, पीएमपीएल बससेवा बंद ठेवण्यावरही खासदार गिरीश बापट यांनी आक्षेप घेतला आहे.


हेही वाचा : Pune Lockdown – काय राहणार चालू? काय राहणार बंद?