पुण्यातील मुस्लिम कुटुबांची कोरोनाविरोधात लढाई, आई-वडील-मुलगा ऑनफिल्ड

pune mulani family fight with coronavirus
आई, वडील आणि मुलगा तिघेही कोरोनाविरोधात काम करत आहेत.

दिल्लीत तबलिगी मरकझमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप केला जातो. महामारीला धार्मिक रंग देऊन नागरिकांचे डोके भडकविण्याच्या प्रयत्न होतो. तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील एक मुस्लिम कुटुंब जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधात लढाई करत आहे. पुण्याच्या मुलाणी कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वडील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक आहेत, आई नर्सेचे काम करते तर मुलगा पोलीस दलात आहे. रमजानचा महिना सुरु झालाय. मुस्लिम समाज या महिन्यात नमाज पठण आणि अल्लाच्या प्रेमात दंग झालेला असतो. मात्र मुलाणी परीवार कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दंग झालेला असून मानवतेचे कर्तव्य पार पाडत रमजान महिना साजरा करत आहे.

देशासमोरील कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. या कोरोनाविरोधात लढाईत डॉक्टर, नर्स, पोलीस आणि स्वछता कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. जे अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यांच्या कुटूंबियांना त्यांची काळजी असतेच, मात्र पुण्यातील पैगंबर मुलाणी यांचे संपुर्ण कुटूंबीय वैद्यकीय आणि पोलीस खात्यात सेवा देत आहे. पैगंबर मुलाणी स्वतः पुण्यातील नवले हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागात कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी शमीम पैगंबर मुलाणी याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत. तर त्यांच्या मुलगा आमिर मुलाणी पुण्याच्या शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.

मुलाणी कुटुंब मूळचे सोलापूर जिल्हाचे असून पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. मुलानी कुटुंबीय छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदर्श मानतो. आई-वडील आणि मुलगा हे तिघेही कोरोनाच्या संकटात ड्युटी करतायत. मात्र त्यांच्या मनात कोणतीही भीती नाही. देशसेवेत या कुटुंबियांनी स्वतःला वाहून घेतले आहेत. दररोज कामावरून परत येत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र तरी सुद्धा मुलाणी कुटुंबीय एकमेकांना सहकार्य करत आंनदाने आपली सेवा बजावत आहेत.

आईमुळे आला आत्मविश्वास

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मला माझ्या आईची आणि वडिलांची काळजी वाटते. मात्र आई मला म्हणते, “करोनामुळे संपूर्ण मनुष्य प्रजातीवर संकट आले आहे. त्यामुळे आपण त्यांना मदतीसाठी कर्तव्यावर जावेच लागणार आहे. तू माझी काळजी करू नकोस. आम्ही सर्व तुझापाठीशी आहे.”

तिच्या या प्रोत्साहनामुळे आम्ही दररोज नवीन उत्साह घेऊन कामावर जातो आणि आपलं कर्तव्य बजावत असतो. मी नागरिकांना हेच सांगू इच्छितो की, “आम्ही तुमच्यासाठी ऑनफिल्ड काम करतो आहोत. तुम्ही फक्त घरात बसून सुरक्षित रहा. आपण नक्कीच सर्व मिळून कोरोनाला हरवू”, अशी प्रतिक्रिया आमिर मुलांनी यांनी दैनिक आपलं महानगरला दिली.