सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी एकाला अटक

Pune police arrest suspect in Sidhu Musewala murder case

पंजाबमधील प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये ही कारवाई केली. काही महिन्यांपासून फरार संतोष जाधवला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर संतोषला रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर केलेअसता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

संतोष बिश्नोई गँगचा सदस्य –

शूटर संतोष जाधव सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातला संशयित आरोपी आहे. 2021 साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरु होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातही त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता त्याची कसून चौकशी केली जात आहे. संतोष लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे.

सिद्धेश कांबळेला अटक –

संतोष जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांची नावे मुसेवाला हत्याकांडात समोर आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू करत संतोष जाधवचा शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांनी सिद्धेश कांबळेला पोलिसांनी अटक केली होती. सिद्धेश हा सुद्धा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य होता. सिद्धेश कांबळेला संगमनेर जवळून अटक करण्यात आले होते. आता संतोष जाधवलाही पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष जाधवच्या शोधासाठी लॉरेन्स बिष्णोईची चौकशी –

ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणातील संतोष जाधवच्या शोधासाठी पोलीसांनी लॉरेन्स बिष्णोईची चौकशी केली होती. लाॅरेन्स बिश्नोईच्या चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक दिल्लीलाही गेले होते. राण्या बाणखेलेच्या खुनानंतर संतोष जाधव फरार झाला होता. संतोष जाधवच्या शोधासाठी पोलिसांनी यापूर्वीच लूकआऊट नोटीस बजावली होती. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित आरोपी म्हणून संतोष जाधवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी लॉरेन्स बिष्णोईची चौकशी पुणे पोलिसांनी केली होती. आता संतोष जाधवला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.