घरक्राइमआर्यनला पकडणारा NCB चा साक्षीदार किरण गोसावी गायब? पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस...

आर्यनला पकडणारा NCB चा साक्षीदार किरण गोसावी गायब? पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील NCB चा साक्षीदार किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांनी एका प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. किरण गोसावी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात असताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी तो भारताबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत त्याच्याविरोधात नोटीस जारी केली आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या अटकेमुळे किरण गोसावी चर्चेत आला. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केल्याने किरण गोसावी चांगलाच अडकला आहे. नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा आर्यन खानला घेऊन जात असतानाचे व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवले. किरण गोसावी आरोपींना कसा काय एनसीबीच्या कार्यालयात घएऊन जाऊ शकतो, असा सवाल नवाब मलिक यांनी एनसीबीला विचारला. त्यावर एनसीबीने गोसावी हा पंच साक्षीदार असल्याचं म्हटलं. एनसीबीचा हा साक्षीदार सध्या गायब असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

किरण गोसावी विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं. २०१८ मध्ये गोसावीवर पुण्यात फरासखान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होती. याप्रकरणी पुण्यातल्या एका तरुणानं तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

किरण गोसावीकडून पालघरमधील तरुणांना गंडा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील माफिचा साक्षिदार बनलेल्या किरण गोसावीने पालघर तालुक्यातील एडवण गावातील दोन तरुणांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये उकळले असून यातरुणांनी दोन वर्षापूर्वी तक्रार करूनही केळवा पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचेही उजेडात आले आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तशी तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील एनसीबीने ज्याला पंच केले आहे, तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचे रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे. किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये उकळले होते.

फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो असे सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावीच्या बँक खात्यात जमा केले होते. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विझा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विझा बोगस

असल्याचे समोर आल्यानंतर दोघांनाही शॉक बसला. येथून ते पालघर येथे आले. पालघर येथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याप्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पण, केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष याने सांगितले. माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर धरवाई करावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे यांची मागणी आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -