पुणे पोलिसांनी ट्विटरवर ‘अशा’ दिल्या दोन सणांच्या शुभेच्छा, होतेय कौतुक

पुणे पोलिसांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा सर्वत्र होत आहे. या माध्यमातून दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापले सण शांततेत साजरे करावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

Pune Police tweeted Eid and Akshay Tritiya wishes
Pune Police tweeted Eid and Akshay Tritiya wishes

अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे दोन सण आज एकत्र साजरे केले जात आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या प्रकरणी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा सर्वत्र होत आहे. या माध्यमातून दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापले सण शांततेत साजरे करावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

या ट्विटमध्ये पुणे पोलिसांनी अक्षय तृतीया आणि रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातील संदेश खूपच खास असून पुणे पोलिसांनी एकाच ट्विटमधून दोन्ही धर्माच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे पोलिसांनी ट्विटमध्ये ईदचा चंद्र अक्षय्य होवो! मी चंद्राला विचारले तुला काय बोलावू..? चौदाव्याचा चंद्र, करवा चौथचा चंद्र, की ईदचा चंद्र? चंद्र हसला आणि म्हणाला, मी एकच आहे, फक्त तुझी माझ्याकडे पाहण्याची पद्धत वेगळी आहे! काहीजण आज ईद दानाचे वाटप करतात, तर काही अक्षय्य तृतीयेला दान देतात. यामध्येच बंधुता आहे, यामध्येच धर्म आहे!, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.