पुणे हादरलं : पत्नी आणि मुलाची हत्या करून आयटी अभियंताची आत्महत्या

पुणे : पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या करून ४४ वर्षीय आयटी अभियंताने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील औंध परिसरात घडली आहे. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आल्यानंतर औंध परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील औंध परिसरातील एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे ३ मृतदेह सापडले आहेत. आयटी अभियंता असलेल्या ४४ वर्षीय तरुणाने बायको आणि आठ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर पॉलिथीन बॅग बांधून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेत जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला तरुण हा पश्चिम बंगालचा असून सुदिप्तो गांगुली (वय ४४, रा. औंध) असे त्याचे नाव आहे. तो पुण्यातील टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. त्याने बायको आणि मुलाला विष दिले आणि त्यानंतर त्यांचे पॉलिथिन बॅगने तोंड आवळून निर्घृण हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घरातून कुठलीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुदिप्तो आधी आयटी क्षेत्रात काम करत होता. त्याने ७-८ महिन्यांपूर्वी आयटी कंपनी मधील नोकरी सोडून एक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदिप्तो गांगुली हा मंगळवारी (१४ मार्च) रात्री फोन उचलत नसल्यामुळे त्याच्या बंगळुरू येथील भावाने मित्रांची मदत घेत सुदिप्तो गांगुली, त्याची पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर सुदिप्तोचा भाऊ आज (१५ मार्च) सकाळी पुण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दुपारी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले. त्यावेळी पोलिसांना घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या चेहऱ्यावर पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.