छत्रपती शिवरायांचा अपमान करत राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरतायत?, संभाजीराजेंचा संतप्त सवाल

pune swarajya sanghatna workers shows black flag protest togovernor bhagatsingh koshyari mp sambhaji chhatrapati reacts

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून आता राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. काळे झेंडे दाखवले म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनही उघड माथ्याने कसे फिरत आहेत? असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला, या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. यावेळी स्वराज्यच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच घटनेवरून आज संभाजीराजेंनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अपमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलीस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे? असा सवालही संभाजीराजेंनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना स्वराज्य संघटनेकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच राज्यपालांच्या सततच्या वादग्रस्त विधानांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले गेले. यावेळी राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच राज्यपालांच्या ताफेच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना अटकाव करण्यात आला.

दरम्यान संभाजीराजे भोसले यांच्यासह उदयनराजे यांनी देखील राज्यपालांच्या विधानावरून त्यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती अशाप्रकारे वादग्रस्त विधान करते हे चुकीचे आहे असे मत व्यक्त खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करत, त्यांनी 3 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

राज्यपालांनी महत्त्वाच्या पदावर असताना अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे आक्रमक होत त्यांनी तीन डिसेंबर रोजी किल्ले रायगड येथे आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे.

शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मोर्चा

दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे फडणवीस सरकाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाबाबत माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. यामुळे सरकाविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघेल. यासाठी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर विशिष्ठ जबाबदारी देण्यात आली आहे.


बिल्डरच्या हाती महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी देणं कितपत योग्य? काँग्रेसचा सवाल