कसबा आणि पिंपरीमधील पोटनिवडणूक बिनविरोध? अजित पवार म्हणतात नाक खुपसणे…

By-elections in Kasba and Pimpri | कसबा आणि पिपंरी येथील दोन जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. त्यामुळे भाजपाकडून दोन्ही ठिकाणासाठी उमेदवार देण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

By-elections in Kasba and Pimpri | पुणे – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड या मतदारसंघांसाठी विधानसभा मतदारसंघांसाठी 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीप्रमाणेच या पोटनिवडणुकाही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे या पोटनिवडणुकांचा सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध होणार का हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – राज्यातील कसबा पेठ अन् चिंचवड पोटनिवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतमोजणी

कसबा पेठ मतदारसंघातील भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. तसेच, चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचेही निधन झाले. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. त्यामुळे भाजपाकडून दोन्ही ठिकाणासाठी उमेदवार देण्यात येणार आहेत. कसबा पेठेत भाजपाची काही नावं पुढे येत आहेत. तसंच, मुक्ता टिळक यांचे पतीही ही निवडणूक लढवू शकतात. शिवाय, पिंपरी चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपाच्या या निर्णयात नाक खुपसणे गरजेचं नाही, असं अजित पवार म्हणाले.

मात्र, या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी, अशी इच्छा दोन्ही शहरांतील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असं अजित पवार म्हणाले.

कसब्यात काँग्रेस की राष्ट्रवादी?

कसब्यातून निवडणूक लढण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेते इच्छूक आहेत. महाविकास आघाडीतून ही निवडणूक झाल्यास उमेदवारीवरून गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसच्या मोहन जोशी ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कसब्याचे तिकिट कोणाच्या पारड्यात पडेल हे पाहावं लागणार आहे.

पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल.