पुणे : पुण्यातील वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला रामराम केला असून ते आता मित्र पक्षांची जुळवाजुळव करताना दिसले. मात्र पदरी निराशा आल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेटी घेतली होती. तसेच मराठा समाजाकडूनही पाठिंबा मिळतो का? याची चाचपणी केली. अशातच मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर करताना पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांचे नाव घोषित केले. उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. (lok sabha election 2024 Pune Lok Sabha Constituency Vasant More candidate from Vanchit Bahujan Aghadi)
हेही वाचा – Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे
वसंत मोरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना एकदाच भेटायला गेलो आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीकडून मला उमेदवारी जाहीर झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेमध्ये असताना मला जी संधी मिळाली, त्याचे सोने करून दाखवले. त्यामुळे या संधीचेही सोने करून दाखवेन. आता मला पुणे शहरावर काम करण्याची संधी मिळेल. परंतु ज्या पक्षात 25 वर्ष मी एकनिष्ठ राहिलो, तिथे मला न्याय मिळाला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला न्याय दिला आहे. पुण्यातील विकासाचा जो पॅटर्न असेल, तो कात्रज विकासाचा पॅटर्न असेल. माझा वैयक्तिक कोणताच पॅटर्न नसेल. त्यामुळे मी कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. कारण त्यांच्यामुळेच ही संधी मिळाली आहे, असे वसंत मोरे म्हणाले.
हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट; उदय सामंत यांचा आरोप
वंचितचा बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. मविआसोबत लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार असलेले प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे वंचित आणि मविआमध्ये सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याचे समोर आले. त्यानंतर आतापर्यंत मविआने 24 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पण आजच्या यादीतून वंचितने मात्र, बारामती लोकसभेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.