Monsoon Alert : मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : नागरिकांना उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण यावर्षी मान्सून 7 जूनपर्यंत तळकोकणात पोहोचण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागाने म्हटले की, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्राकडे वेगाने वाटचाल करेल.

कोकणात 27 मेपासून हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला असून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यांनी म्हटले की, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने केरळामध्ये 4 जून ऐवजी 1 जून रोजीच मान्सून दाखल होऊ शकतो. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Meteorological department predicts monsoon to enter Talkonkan on June 7)
सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात असून, तो वेगाने प्रगती करीत आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्याने त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. तसेच महाराष्ट्र ते तामिळनाडू भागावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने हा बदल झाला आहे.
बुधवारी सायंकाळी शहरात गार वारे सुटल्याने हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सायंकाळी ७ वाजता पुण्यावरील बाष्पयुक्त ढग आल्याचे सॅटेलाईट छायाचित्र शेअर केले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या उकाड्यातून लवकरच पुणेकरांची सुटका होण्याचे संकेत आहेत. याआधी मंगळवारी अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल झाले. त्याचा तत्काळ परिणाम दिसत आहेत. पुणे शहराचा पारा ४०.३ अंशांवरून बुधवारी ३७ अंशांपर्यंत खाली घसरला होता.

दरम्यान, स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी सांगितले की, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 19 मे रोजी अंदमानच्या समुद्रात धकड दिली होती. मात्र, त्यानंतर कोणतीची प्रगती दिसून आली नाही. हिंदी महासागराच्या वायव्येकडील क्रॉस विषुवृत्तीय प्रवाह प्रमाणापेक्षा जास्त मजबूत होऊ लागला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत बंगालच्या उपसागर, अंदामान-निकोबार बेंटांवर मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा पोहचण्याची आशा मावळली असून आता 4 जूनच्या जवळपास मान्सून पोहचेल, असा अंदाज जी.पी.शर्मा यांनी वर्तवला आहे.