नाफेडकडून दोन दिवसांत ३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी; डॉ. भारती पवार यांची माहिती

Onion truck

नाशिक : कांद्याचे दर घसरल्याने नाशिक जिल्ह्यात शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. नाफेडने कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांदा प्रश्न चांगलाच गाजला. शासनाने नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या दोन दिवसांत ३ हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. कांदा निर्यात बंद नव्हती, तर निर्यात सुरू आहे. पण विरोधकांकडून अप्रचार सुरू असल्याची टीका भारती पवार यांनी यावेळी केली.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटला असून राज्यभरात शेतकर्‍याकडून आंदोलन करण्यात आले. याची दखल आज विधिमंडळाच्या सभागृहात देखील घेण्यात आली. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर कांद्याला हमीभाव देण्याबाबत आंदोलन केले. शिवाय सभागृहात देखील कांदा हमीभावाचा विषय मांडण्यात आला. कांदा दरप्रश्नी शेतकरयांनी बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. अशातच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरु करण्यात आली असून मागील दोन दिवसांत 3 क्विंटल कांदा खरेदी झाल्याचे त्या म्हणाल्या. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कांदा खरेदी केली जात आहे. शेतकर्‍यांच्या कांद्याला नाफेडच्या माध्यमातून उचल मिळते आहे. कांदा निर्यात बंद नव्हती निर्यात सुरू असून विरोधकांकडून अप्रचार सुरू आहे. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी निर्यात करावी. शेजारील राष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला होता. यापुढेही कांदा निर्यात आणि नाफेडकडून कांदा खरेदी सुरू राहील, अशी माहिती भारती पवार यांनी दिली आहे.

साडेचारशे रुपयापासून बाजार खुले

सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर परिस्थिती जैसे थे आहे. दुसरीकडे सभागृहात विरोधकांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबत मागणीला जोर लावला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडने कांदा खरेदी सुरु केली असल्याचे ते म्हणाले. ज्या भागात अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही, त्या ठिकाणी लवकरात लवकर कांदा खरेदी सुरु होईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.