नाशकात ‘पुष्पा’राज; चक्क महाराष्ट्र पोलीस अकादमीतून चंदन चोरी

नाशिक : शहरातील शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने, पोलीस वसाहती तसेच अन्य काही ठिकाणांहून चंदन चोरीच्या घटना घडत असताना आता सलग दुसर्‍यांना थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीची अत्यंत कडक सुरक्षा भेदून चंदनाच्या झाडाची चार खोडे चोरट्यांनी बुंध्यापासून कापून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांना आव्हान देणार्‍या या घटनांमुळे नाशकात पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ सुरू झाल्याचे दिसून येतेय.

शहरात चंदन चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई झाल्यानंतर या घटना कमी झाल्या होत्या. मात्र अलिकडे पुन्हा एकदा चंदन चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (एमपीए) परिसरातून गेल्या तीन महिन्यांत दुसर्‍यांदा पोलिसांनाच आव्हान देत चंदन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शेकडो पोलीस कर्मचार्‍यांच्या पहार्‍यातून, कडेकोट सुरक्षेतूनही चंदन चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुरुवारी झालेल्या चोरीत अकादमीतील मेसजवळच्या पश्चिम बाजूला विहिरीनजिक असलेल्या चंदनाच्या झाडांचा बुंधा कापून नेण्यात आलाय. सहा हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांचा पाच ते सहा फूट लांबीचा मुख्य भाग, साडेचार हजार रुपये किमतीचा तीन ते चार फूट लांबीचा बुंधा, त्यानंतर साडेचार हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाडाचा तीन ते चार फूट लांबीचा मुख्य भाग तसेच दोन हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड बुंध्यापासून कापलेले व जमिनीवर पडलेले असे एकूण 17 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाची खोडे अज्ञात चोरट्याने बुधवार (दि. 27) ते गुरुवार (दि.28) दरम्यान मध्यरात्री चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नागनाथ दयानंद काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेकडो कर्मचार्‍यांचा पहारा, मात्र दुसर्‍यांना चोरीचे धारिष्ठ्य !

महाराष्ट्र पोलीस अकादमी ही पोलीस उपनिरीक्षकांसह विविध विभागातील अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. त्यांच्याकडून अकादमीत प्रवेश करू इच्छिणार्‍या प्रत्येकाची ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्रांची वेळोवेळी तपासली केली जाते. अगदी काटेकोरपणे ही सर्व सुरक्षा प्रक्रिया पाळली जाते. कोणत्याही ओळखीशिवाय कुणाला आत प्रवेश मिळत नाही. मात्र, असे असताना सलग दुसर्‍यांदा अकादमीतून चंदनाच्या झाडांची चोरी होणे आणि त्याचा मागमूस कुणालाही न लागणे, ही बाब आश्चर्यचकीत करणारी आहे.

शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने टार्गेट

फेब्रुवारी महिन्यात विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची सुरक्षा भेदून चंदनाची झाडे चोरण्यात आली होती. यानंतर पाथर्डी फाट्यावरील फार्महाऊसमध्ये चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला होता. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या शिंगाडा तलाव परिसरातील घराजवळूनही चंदनाचे झाड कापून नेण्यात आले होते.