घरमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र संसद भवनात लावा, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र संसद भवनात लावा, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहाप्रमाणे दिल्लीतील नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्रामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिद्ध संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले, त्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे, असे भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्राविषयी केंद्र सरकारकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा, अशी सूचनाही छगन भुजबळ यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीला तैलचित्राचे अनावरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत 23 जानेवारी 2023 रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

- Advertisement -

शिंदे गटातील खासदारांची मागणी
महाराष्ट्र सदनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा, संसदेच्या नव्या इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले पाहिजे, अशी मागणी शिंदे गटातील सर्व खासदारांनी केली आहे. या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुलै महिन्यात यासंदर्भात चर्चा केली आणि शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. हे निवदेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -