जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, पालिकेतील फिक्स्ड डिपॉझिटबाबत फडणवीसांचं प्रत्युत्तर

devendra fadnavis

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईतील विकासकामांचा तडाखा लावला आहे. यावरून ठाकरे गटाने विद्यमान सरकारवर ताशेरे ओढले होते. २५ वर्षांत आम्ही पालिकेच्या फिक्स्ड डिपॉजिटमध्ये जमा केलेल्या पैशांचा अपव्यय या सरकारकडून केला जात असल्याचा आरोप केला गेला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. “जनतेच्या करातून मिळालेला पैसा तुम्ही जमा केला. हा पैसा जनतेसाठीच लावा,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज मुंबई ३२० कामांचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दर पावसाळ्यात विविध माध्यमांतून केवळ मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर सोशल मीडियावर जेवढे व्यंग, मिम्स तयार होतात तेवढे कोणत्याही गोष्टीवर तयार होत नाही. या पालिकेकडे एवढा पैसा आहे तरी २५ वर्षे राज्य केल्यानंतरही रस्ते चांगले करता आले नाहीत. तेच खड्डे बुजवायचे, डांबर टाकायचं, वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि तरीही जनतेला खड्ड्यामध्ये टाकायचं, ही निती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉन्क्रिकटचे तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला. यामुळे पुढचे ५० वर्षे रस्त्यांची डागडुजी करावी लागणार नाही. कोणत्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाही.

“सध्या ५०० किमी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत, अजूनही ५०० किमी रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. येत्या दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई करायची आहे. सहा महिन्यांत आम्ही जे काम केलं ते २५ वर्षांत काम का झालं नाही, असा सवाल आपण विचारू म्हणून काही लोक यावर आक्षेप घेतात. काही लोकांना याचंच दुख आहे की बँकेतील पैसे का खर्च करतात. पण जनतेचा पैसा जनतेसाठी लावा,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जनतेने कररुपात दिलेला पैसा यांनी बँकेत जमा केला. त्यावर यांना ३-४ टक्के व्याज मिळतं. पण हाच पैसा मुंबईकरांसाठी वापरला तर मुंबईकरांचं जनजीवन सुरळीत होईल हे यांना कळत नाही. ज्या प्रोजेक्टमधून माल मिळतो, मलाई मिळते असेच काम हे हातात घ्यायचे. आज ज्याप्रकारे मुंबईच्या झोपडपट्टीच्या विभागात लाईट्स, नालीचं काम, सार्वजनिक शौचालय, गटारे अशी वेगेवगेळी कामं हाती घेतली आहेत ते झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीलाही पायाभूत सुविधा मिळव्यात याकरताच,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मुंबईकरांना स्वच्छ मुंबई मिळणार आहे, मुंबईतील मोकळ्या सार्वजनिक जागाही परत मिळणार आहेत. लोकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन पाहायला मिळणार. हे सरकार आल्यानंतर इतक्या वर्षांपासून रखडलेलं एसटीपीचं काम सुरू केलं आहे. आपण गेले कित्येक वर्षें समुद्रात घाण पाणी सोडत करत होतो, पर्यावरण खराब करत होतो. मी मुख्यमंत्री असताना एसटीपीच्या प्रकल्पासाठी केंद्राकडून परवानगी आणूनही ते काम होऊ शकलं नाही. परंतु, शिंदेंचं सरकार आलं आणि त्या कामालाही सुरुवात झाली आहे. आपला समुद्र किनारा निर्मळ पाहायला मिळणार आहे. परदेशाप्रमाणे समुद्रकिनारा पाहायला मिळणार आहे,” असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. टनेल्सच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी करतोय. मुंबईचं इंटिग्रेशन करण्याचं काम सुरू केलंय. आपण कोणतंही काम सुरू केलं की काही लोक म्हणतात हे आमच्याच काळात झालंय. अडीच वर्षापैकी दोन वर्षे तर दरवाजाच्या आतच होते. मग काय सहा महिन्यात त्यांनी मुंबईत बदलून टाकली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


आम्हाला माफ करा

मुंबईत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे याचा मुंबईकरांना त्रास होतोय. एकाचवेळी सर्व प्रकल्प हाती घेण्यात आल्याने थोडी अडचण होतेय. प्रदूषण होतंय. पण काळजी करू नका. दोन-तीन वर्षांत सगळी कामं संपल्यावर हा त्रास होणार नाही. दरवर्षी होणारी कामं एकदाच करू, आणि ३०-४० वर्षे पुन्हा काही करायची गरज नाही. हा त्रास सहन करा आणि आम्हाला माफ करा, असंही फडणवीस म्हणाले.