अजोय मेहतांमुळे महाविकास आघाडीत ठिणगी?

Ajoy Mehta and CM Uddhav Thackeray
मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात ठाकरे सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू असतानाच आता या सगळ्याला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता जबाबदार असल्याची चर्चा महाविकास आघडीच्या नेत्यांमध्ये रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दबावाखाली काम करत आहेत की काय? अशी शंका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपलं महानगरशी खासगीत बोलून दाखवली आहे. मुख्य सचिव अजोय मेहता हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी होते. त्यामुळे ते फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम तर करत नाहीत ना? अशी शंका देखील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना वाटू लागली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर फार विश्वास दिसत आहे. त्यांच्या विश्वासामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मंत्री असूनही संकटाच्या काळात राज्यात काहीच करू शकत नाही. याचमुळे संकटाच्या काळात जर आमचे मंत्रिपद कामाचे नसेल तर त्या मंत्रीपदाचा काय उपयोग? अशी भावना महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांच्या मनात निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जसे अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत आहेत. तसा विश्वास त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही दाखवावा, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान हीच खंत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलून दाखवली. यासाठीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान राज्यासह देशात लॉकडाऊन ४ सुरू असून, राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. भविष्यात ही आकडेवारी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आणि राज्यातील काही भागांमध्ये लॉकडाऊन वाढवण्याखेरीज ठाकरे सरकारसमोर पर्याय नाही. त्यातच यापुढील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय हा त्या त्या राज्याचा असून, केंद्र सरकारकडून मिळणारी मदत देखील राज्यात यापुढे मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. यातच जर राज्यातील लॉकडाऊन वाढवला तर पैसे कुठून आणायचे याची चिंता ठाकरे सरकारला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत या विषयावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर राज्याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्राची असेल त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता आणि ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमधील मतभेद बघता राज्यात येत्या १५ दिवसांत राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

म्हणून सरकार टिकवण्यासाठी संजय राऊतांचा पुढाकार

राज्यात जर ठाकरे सरकार कोसळले तर त्याचा सर्वाधिक फटका हा शिवसेनेला बसणार आहे. हे सरकार टीकावे यासाठी आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत हे पुढाकार घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेतील अनेक इच्छुकांना मंत्री होता आले नाही. त्यामुळे राज्यात शिवसेना फुटण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात पक्ष फुटू नये म्हणून आणि भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू नये म्हणून संजय राऊत पुढाकार घेत आहेत. पण यावेळी संजय राऊत यांच्यासमोर आव्हान असेल ते महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील नाराजी दूर करण्याचे.

अजोय मेहता यांच्या इतिहासाबद्दल

अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. धुळ्याचे सहायक जिल्हाधिकारी (प्रोबशनरी) म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी अहमदनगर, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (सुधार); केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक; महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) चे व्यवस्थापकीय संचालक; महाराष्ट्र राज्य वीज सुत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक; पुनर्रचित रत्नागिरी वायू व वीज मंडळावर नियुक्ती, महाराष्ट्र राज्य उर्जा खात्याचे प्रधान सचिव; महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष; फेब्रुवारी 2009 ते दिनांक जानेवारी 2015 या कालावधीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे व्यवस्थापकीय संचालक, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि त्यानंतर एप्रिल 2015 पासून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते.

मार्च २०१९ मध्ये राज्याच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सप्टेंबर २०१९ ला निवृत्त होणार होते. मात्र राज्यातील निवडणुका लक्षात घेता त्यांना मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोनाचे संकट असल्याने आता ते जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. विशेष बाब म्हणजे केंद्रात काम केल्यामुळे ते भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या खास मर्जीतले होते. तसेच भाजप नेत्यांशी देखील त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एवढेच नाही तर अजित पवार यांच्यासोबत देखील ऊर्जा खात्यामध्ये काम केल्याने त्यांचे अजित पवार यांच्याशी संबंध चांगले आहेत तर मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम केल्याने शिवसेनेशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत.