घरमहाराष्ट्रQuestion by Jitendra Awhad : शांतसंयमी राम आता उग्र का झाला? आव्हाड...

Question by Jitendra Awhad : शांतसंयमी राम आता उग्र का झाला? आव्हाड यांचा सवाल

Subscribe

मुंबई : रामनवमी आणि हनुमान जयंतीसारखे सण आता दंगलीसाठीच आहेत की काय, असे वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते व माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी म्हटले होते. त्यावरून राजकीय वादळ उठले. याच अुषंगाने आव्हाड यांनी रविवारी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ‘शांतसंयमी राम आता उग्र का झाला?’ असा सवाल (Question by Jitendra Awhad) उपस्थित केला आहे. तुम्ही राम बदलवलात, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागाचा शुक्रवारी मेळावा झाला. या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीबद्दल वक्तव्य केले होते. रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, गुजरात, पश्चिम बंगाल आणि बिहार येथे दोन गटांत दंगली झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी, रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव दंगली घडवण्यासाठीच आहेत की काय, असे वाटू लागले असल्याचे म्हटले होते. यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला. हा रामभक्तांचा अपमान आहे. नेत्यांनी अशा प्रकरणात संवेदनशीलपणे वागले आणि बोलले पाहिजे. सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिला.

रामाकडे बघण्याची दृष्टी कशी बदलली
आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. प्रभू श्रीरामाकडे बघण्याची दृष्टी का बदलली? असा सवाल त्यांनी केला. सत्तेची कोणतीही लालसा न ठेवता माता-पित्याच्या आज्ञेप्रमाणे वनवासात जाणारा राम, जातीभेदाला थारा न देता शबरीने दिलेली बोरे खाणारा राम, समुद्रात सेतू बांधून लंकेत जाणारा आणि रावणाशी युद्ध करणारा राम, रावणाचा म्हणजेच ओघाने अधर्माचा वध करणारा राम, पुन्हा सत्तेची लालसा न ठेवता बंधू लक्ष्मणाऐवजी बिभिषणाकडे लंकेचा कारभार सोपवणारा राम आणि अयोध्येत परतल्यानंतर लोकांचे ऐकणारा राम… अशी त्याची भिन्नभिन्न रुपे आहेत. मग त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कशी बदलली? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisement -

पुढील 10 वर्षांत घडू नये म्हणून…
एका बाजूला सीता, दुसऱ्या बाजूला लक्ष्मण, पुढे पायाशी हनुमान असलेली एक शांतसंयमी श्रीरामाची मूर्ती आपण सर्व पाहात आलो आहोत. पण आता धनुष्याची प्रत्यंचा ताणलेला उग्र राम पाहायला मिळते. हा बदल का झाला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. गेल्या 10 वर्षांत जे घडले नाही, ते आता घडले आहे. पुढील 10 वर्षांत पुन्हा तसे काही घडून नये म्हणून मी तसे मत मांडले आणि त्यावर मी ठाम आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मला राम समजावू नका
मी स्वत: नाशिकचा आहे. पंचवटी येथे रामाने वास्तव्य केले होते. त्यामुळे मला कोणी राम समजवायला जाऊ नये, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -