रमजानमध्ये माय मराठीत कुराण प्रवचने; घरातील श्रद्धावंतांना ऑनलाईन मार्गदर्शन

मुस्लिम विद्यार्थी संघटनेकडून नागरिकांसाठी ऑनलाईन प्रवचनांच्या माध्यमातून कुराणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे शनिवारपासून सुरू झालेल्या रमजान महिन्यात मुस्लिम नागरिकांना मशिदीत नमाजमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थी संघटनेकडून नागरिकांसाठी ऑनलाईन प्रवचनांच्या माध्यमातून कुराणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रवचन हिंदीबरोबरच मराठी भाषेमध्ये होणार आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच घरामध्ये बसले आहेत. त्यातच शनिवारपासून सुरु झालेल्या रमजानमध्ये मुस्लिमांना मशिदीत जाता येणार नसल्याने त्यांना कुराणचे पठण करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन जमात-ए-इस्लामी हिंद आणि विद्यार्थी संघटना स्टूडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ) मुस्लिम नागरिकांसाठी दररोज तीन प्रवचने ऑनलाईन प्रारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एक प्रवचन हिंदीमध्ये, दुसरे मराठीत आणि तिसरे महिलांसाठी खास प्रवचन प्रसारित केले जाणार आहे. या प्रवचनांद्वारे इस्लामिक विद्वान कुराणच्या शिकवणीचे स्पष्टीकरण देतील आणि ज्यांना या पवित्र महिन्याच्या काही नियमित कामे व कृतीपासून वंचित राहावे लागणार आहे, मार्गदर्शन करतील.

एसआयओ १ मे पासून राज्यातील मराठी भाषिक लोकांना कुराण समजवण्यासाठी ऑनलाइन ‘कुराण सार’ नावाची विशेष मालिका सुरू करणार आहे. रमजानचे महत्त्व कुरणामुळेच आहे, कारण याच महिन्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईशग्रंथ कुराण अवतरीत केला गेला. या महिन्यात दररोज रात्री ‘तरावीह’ नावाची विशेष प्रार्थना केली जाते, जिथे दररोज कुराणच्या ३० भागांमधून एका भागाचे वाचन केले जाते. सामान्यत: अरबी भाषेत पाठ होत असताना अनेक मशिदींमध्ये स्थानिक भाषांमध्ये याचे भाषांतर केले जाते, असे मराठी प्रवचन देणारे इस्लामिक विद्वान नौशाद उस्मान यांनी सांगितले.

इस्लामी अभ्यासक आणि जमातचे उपाध्यक्ष एस. अमीनुल हसन हे जमातच्या सोशल मीडिया चॅनेलवर दररोज रात्री खुलसा-ए-तरावीह नावाचे हिंदी प्रवचन देतील. महिलांसाठी ‘दौरा-ए-कुराण’ नावाच्या चर्चेची एक विशेष ऑनलाइन मालिका सुरु करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून उपवासाचा महीना पाळताना सर्व आवश्यक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष रिझवान-उर-रहमान खान यांनी केले.