वाचाळपणा करत राहिलात तर भविष्यात एकटेच राहाल, विखे पाटलांचा ठाकरेंना टोला

radhakrishna vikhe patil

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर भविष्यात एकटे पडाल, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अडीच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पुर्तता केली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज कनेक्शन तोडू नये अशा सूचना अगोदरच दिल्या आहेत. आपण मात्र बांधावर जावून विज कापण्याचं काम केलं. पातळी सोडून जर वाचाळपाणा करत राहीलात तर भविष्यात ते एकटेच राहतील, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

कोविडमध्येही लोक वाऱ्यावर होते, नंतरही कुठली मदत नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसता तर राज्याची अवस्था काय झाली असती?, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे आणि पुढची २० वर्ष शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहणार असा दावा विखे पाटलांनी केला.


हेही वाचा : दापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून समन्स