राधाकृष्ण विखे पाटीलांनी काँग्रेस निष्ठा सिद्ध करावी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘काँग्रेस हे जळतं घर आहे’, असे वक्तव्य केले होते, याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येत असतो. विशेषत: महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यात काँग्रेसमध्येच दोन सत्ताकेंद्रे किंवा नेतृत्व निर्माण झाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसण्याची शक्यता विखे-थोरात यांच्या वादामुळे दिसून आली आहे. या दोन्ही घराण्यांमधील जुने वैर बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे निमित्त करून पुन्हा उकरून काढले आहे. विरोधी पक्ष नेतेपदी असताना मुलगा सुजय भाजपमध्ये गेला असेल, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षनिष्ठा सिद्ध करावी, भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरात यांनी आता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी थोरातांनी केली आहे. विखे पाटील यांच्या कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिले आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. सुजय विखे यांचा निर्णय अजिबात वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिले, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिले आहे, असे थोरात म्हणाले. विखेंच्या सर्वच अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या असताना हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरणार नाही याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटलांविरुद्ध अविश्वासाचे वातावरण
मी काँग्रेस कमिटीचा सदस्य नाही. त्यामुळे मी नगरच्या जागेचा आग्रह करणे योग्य नाही. राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी की नाही हा त्यांचा निर्णय आहे. राज्यात महत्त्वाची जबाबदारी असणारे नेतृत्व विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.

सुजय विखे पाटील यांच्या पक्षांतरानंतरही राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेतेपदी राहणार असतील तर त्यांनी बैठक घेणे गरजेचे आहे. स्क्रीनिंग कमिटीत असताना आता त्यांनी नेतृत्व दाखविण्याची गरज आहे, असा सल्लाही थोरात यांनी दिला. जर ते विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसतील तर जनतेच्या समोर येऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याविरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले.

सुजय यांचा निर्णय वैयक्तिक नव्हता
रणसंग्राम जवळ आला असताना ज्यांनी नेतृत्व करायचे अशा विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगाच जर दुसर्‍या पक्षात जात असेल, तर ही पक्षासाठी चांगली गोष्ट नाही. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयामागे राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाटा नव्हता, तो सुजय यांचा हट्ट होता, असे म्हणण्याला तथ्य नाही, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

डॉ. सुजय यांचा निर्णय हा वैयक्तिक होता, त्यासंदर्भात मी पक्षनेतृत्वाला सर्व कळवले आहे. मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, यासंदर्भात प्रसारमाध्यमांनाच घाई लागलेली दिसत आहे. पक्षनेतृत्वाकडून अद्याप अशी मागणी आपल्याकडे करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणावर आपण दोन दिवसांतच भूमिका जाहीर करणार आहे, असे काँगे्रसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.