शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग सात वेळा शिर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळीही भाजपकडून पुन्हा राधाकृष्ण विखे पाटलांनाच रिंगणात उतरवण्यात आले. तर विखे पाटील यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचे आव्हान होते. या अटीतटीच्या लढतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय संपादन केला आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण ७४.५२ टक्के मतदान झाले आहे. वाढलेला मतटक्का भाजपच्या उमेदवाराच्याच पथ्यावर पडले आहे. राधकृष्ण विखे पाटलांना तब्बल ५० हजार ५१७ मतांची विक्रमी आघाडी मिळाली आहे. राधकृष्ण विखे पाटलांच्या पारड्यात यंदा १ लाख २० हजार ४८२ मते पडली आहेत. तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंना ६० हजार ९६५ मते मिळाली आहेत. तर भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांना केवळ १ हजार ३९० मते मिळाली आहेत. बंडखोराला घरचा रस्ता दाखवण्यात विखे पाटलांना यश आले आहे. तर काँग्रेस उमेदवारावरही विखे पाटलांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता १९९५ पासून विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. विखे पाटील घराणे हे विठ्ठलराव विखे पाटलांपासून सहकार क्षेत्रात सक्रीय असलेले घराणे. त्यामुळे या घराण्याचे नगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. याच्या जोरावरच राधाकृष्ण विखे पाटील ११९५ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते आतापर्यंत पण २०१९ च्या निवडणूक काळात विखे पाटलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले आणि निवडूनही आले.