भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या माध्यम प्रमुखपदी रघुनाथ पांडे यांची नियुक्ती

bjp1

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे माध्यम प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक रघुनाथ पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती करत असल्याचे पत्र रघुनाथ पांडे यांना दिले आहे. रघुनाथ पांडे यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकांमध्ये पत्रकारिता केली तसेच संपादक म्हणून कामाचा ठसा उमटविला आहे. राजकीय, साहित्य, चित्रपट व विकासात्मक वार्तांकन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

रघुनाथ पांडे यांना ३० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून त्यांनी अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नवी दिल्ली येथे त्यांनी पत्रकारिता केली असून प्रिंट, टीव्ही आणि वेब या जनसंवाद माध्यमांच्या क्षेत्रात त्यांनी काम केले. दैनिक हिंदुस्थान , तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ या दैनिकात त्यांनी बातमीदारी केली. तर दैनिक ‘सामना’च्या विदर्भ आवृत्तीचे ते प्रमुख होते. त्यांनी मुंबई येथे लोकमतच्या सेंट्रल डेस्क या संपादकीय व्यवस्थेत राज्य पातळीवर अनेक वर्षे काम केले. तसेच नवी दिल्ली येथे ‘लोकमत’चे विशेष राजकीय प्रतिनिधी म्हणून संसदिय कामकाजाचे वार्तांकनही केले. ‘दिल्ली दरबार’,‘वेध’ व शून्य प्रहर हे त्यांचे राजकीय स्तंभ नियमित प्रसिद्ध झाले आहेत.

नागपूर येथे दैनिक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे व नवभारत समूहाच्या नवराष्ट्र या दैनिकाचे संपादकपद त्यांनी भूषविले. राजकीय, साहित्य,चित्रपट या वार्तांकनासाठी त्यांनी परदेश प्रवास केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा राज्य विकासवार्ता पुरस्कार त्यांना १९९० मध्ये मिळाला. त्यासोबतच राज्य सरकारचा लोकनायक बापुजी अणे पत्रकारिता पुरस्कार, महात्मा गांधी पत्रकारिता पुरस्कार, लोकमत समूहाचा पत्रपंडित पां.वा.गाडगीळ आर्थिक व विकासात्मक लेखन पुरस्कारासह सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या विद्यापीठीय समितीत त्यांनी अनेक वर्षे योगदान दिले आहे.


हेही वाचा : सरकारमधील नाराज 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मिटकरींचा खळबळजनक दावा