राहुल गांधी-आदित्य ठाकरे यांची गळाभेट, रणजित सावरकरांनी शिवसेनेला दिला इशारा

आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतली. त्यांना मिठी मारली. खरंतर त्यांनी त्यांचा सहवासही टाळायला हवा. तुमची आघाडी आहे तर तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की सावरकरांचा अपमान टाळायला पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

ranjeet savarkar and aditya thackeray

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भारत जोडो यात्रेदरम्यान केला होता. यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर शिवाजी महाराज पोलीस चौकात राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. तसंच, शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांशी सहवास टाळायला हवा, असा इशाराही रणजित सावरकरांनी दिला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

हेही वाचा – …तर आदित्य ठाकरेंना गोमूत्राने अंघोळ करावी लागेल; शीतल म्हात्रेंचा टोला

रणजित सावरकर म्हणाले, ‘क्रांतीकारांशी राहुल गांधींचा काहीही संबंध नाही. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ब्रिटिशांनी कधीही मान्य केलं नाही की सावरकरांनी माफी मागितली. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवतीर्थावर जोडोमारो आंदोलन झालं होतं. आज शिवसेनेचे वारस आहेत ते सावकरांचा अपमान करत आहेत. बाळासाहेबांच्या आजच्या स्मृतीदिनी नाना पटोलेंनी सावकरांचा अपमान केला आहे.’

हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली, खासदार राहुल गांधींची पुन्हा टीका

‘इंदिरा गांधींनी सावकरांचा सन्मान केला होता. काँग्रेसचे अनेक नेते येत होते. पण हिंदुत्त्ववादी शक्तींकडे सत्ता आली तेव्हा सावरकरविरोधी भूमिका बाहेर आली. त्याआधी कोणीही बोलत नव्हतं. मधल्या १० वर्षांत वाजपेयींचं सरकार नव्हतं, तेव्हा सावरकरांवर आरोप होत नव्हते. आता पुन्हा २०१४ मध्ये सरकार आल्यानंतर सावरकरांवर आरोप सुरू झाले आहेत,’ असंही रणजित सावरकर म्हणाले.

‘राहुल गांधींनी केलेल्या आरोपात दम नाही. सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केल्यास तुमच्या अंगावरच शिंतोडे पडतील. हे सत्तेचं राजकारण आहे,’ असं रणजित सावकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतली. त्यांना मिठी मारली. खरंतर त्यांनी त्यांचा सहवासही टाळायला हवा. तुमची आघाडी आहे तर तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे की सावरकरांचा अपमान टाळायला पाहिजे,’ असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात २०१७ मध्येही तक्रार दाखल केली होती. तेव्हा कोर्टाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आताही याविरोधात शिवाजी महाराज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. सावरकरांची बदनामी आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान या कलमाअंतर्गत तक्रार दाखल करणार आहे, असंही रणजित सावकर म्हणाले.