Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशRahul Gandhi : राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी आणि खर्गेंचे निवडणूक आयोगाला सवाल

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी आणि खर्गेंचे निवडणूक आयोगाला सवाल

Subscribe

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे प्रचारासाठी आलेले कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्याआधी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सगळेच राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडले आहेत. अशातच एक मुद्दा सातत्याने गाजतो आहे, तो म्हणजे प्रचारासाठी आलेल्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे प्रचारासाठी आलेले कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली. (rahul gandhi bag checked again mallikarjun kharge made allegations)

या निवडणूक प्रचारात बॅगा तपासण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. उद्धव ठाकरे यांनी वारंवार या मुद्द्याला तोंड फोडले आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीत प्रचार सभा झाली. त्यापूर्वी हिंगोली येथे त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : ही निवडणूक आयोगाची नौटंकी…संजय राऊत का भडकले?

20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार सभा घेण्यासाठी राहुल गांधी शनिवारी अमरावतीत आले होते. अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांसाठी धामणगाव रेल्वे हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरल्यानंतर राहुल गांधी यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

माजी मंत्री आणि तेवसाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची तपासणी का केली जात नाही, असा सवालही उपस्थित केला.

प्रचारासाठी दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगा सलग दोन दिवस तपासल्या गेल्या. विशेष म्हणजे, त्यांचीच सभा पहिली झाल्याने बॅगा तपासण्याचा अनुभव त्यांना दोन दिवस सलग आला. याचे त्यांनी स्वतः शूटिंग देखील केले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे पोहोचले असता तिथेही त्यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी झाली. उद्धव ठाकरे यांनी तिथे देखील व्हिडिओ शूट करून तुम्हाला पहिला गिऱ्हाइक म्हणून मी सापडलो का, असा सवाल त्या पथकाला केला. त्यांच्या या शूटिंगनंतर आणि निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांमुळे बॅगा तपासण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच माझ्या बॅगा तपासता तर मोदी – शहांच्या देखील बॅगा तपासा, असे आव्हानही त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांच्या बॅग तपासण्याचे व्हिडीओ समोर आले.

खर्गे का भडकले?

या बॅग तपासणी प्रकरणावरून खर्गे यांनी नाराजी व्यक्त करतानाच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतानाही विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांना झारखंड विमानतळावर आरक्षित लाऊंज मिळाला नाही, यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांना शुक्रवारी झारखंड येथून उड्डाण करण्यास जवळपास दोन तास उशीर झाला. ज्यानंतर या उशिरामागे राजकारण असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. (rahul gandhi bag checked again mallikarjun kharge made allegations)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -