घरताज्या घडामोडीराहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; सरकार स्थिर!

राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; सरकार स्थिर!

Subscribe

राज्यात महाविकासआघाडीतल्या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष असलेला भाजप या तिनही पक्षांमध्ये वादाच्या किंवा असमन्वयाच्या संधीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळालं. तशी संधी भाजपला खुद्द काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीच मिळवून दिली. ‘महाराष्ट्रात आम्ही डिसिजन मेकर नाहीत’, असं वक्तव्य करून राहुल गांधींनी राजकीय चर्चांचा मोठा धुरळा उडवून दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि इतर विरोधी पक्षांकडून सरकारमध्ये अस्थिरता असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची चर्चा सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर तर सरकार कधीही पडेल की काय? असंच चित्र निर्माण केलं गेलं. मात्र, आज राहुल गांधींनी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन करून महाविकासआघाडी सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


वाचा सविस्तर – महाराष्ट्रात आम्ही ‘डिसीजन मेकर’ नाही; राहुल गांधींचं खळबळजनक विधान

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात बऱ्याच हालचाली झाल्याचं पाहायला मिळालं. आधी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दांडी मारली. त्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या पाठोपाठ संजय राऊतांनी राज्यपालांची भेट घेतली. आणि सरतेशेवटी सध्या भाजपवासी असलेल्या नारायण राणेंनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यात थेट राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी केलेलं विधान विरोधकांसाठी आयतं कोलीतच ठरलं!

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ‘राहुल गांधींचं विधान म्हणजे कोरोनाच्या संकटातल्या अपयशाची सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंवर टाकून हात आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे’, अशी थेट टीका त्यांनी केली. त्यानंतर यावरून बरंच राजकारण रंगू लागलं. मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या गुप्त बैठकीवर ‘राष्ट्रपती राजवटीची मागणी करताच घाबरून बैठका घ्यायला लागले’, अशी टीका नारायण राणेंनी केली. राहुल गांधींच्या वक्तव्याला सावरून घेत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे ठामपणे राज्य सरकार स्थिर असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, विरोधकांच्या टीकेमधली धार कमी होत नसल्याचं पाहून अखेर खुद्द राहुल गांधींनीच उद्धव ठाकरेंना फोन करून या चर्चांना पूर्णविराम दिला.

आपल्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पाहून राहुल गांधींनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून काँग्रेस कायम सरकारसोबत असल्याची ग्वाही दिली. ‘राज्यात शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमधली मैत्री कायम आहे. राज्य सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील’, असं राहुल गांधींनी यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस निर्णयप्रक्रियेत पूर्णपणे सहभागी असेल अशी खात्री देखील राहुल गांधींना दिल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला गोंधळ आता शमण्याची चिन्ह आहेत.


वाचा सविस्तर – काँग्रेस कोरोनाचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडतंय, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -