मुंबई : विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीत समावेश न झालेल्या वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जाहीर सभांचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंचित आघाडी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी येत्या 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (20 नोव्हेंबर) यासंदर्भातील माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही या महासभेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Rahul Gandhis invitation to Vanchit Constitution Honoring Mahasabha Information about Prakash Ambedkar)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत संविधान समितीच्यावतीने संविधान सादर केले. त्यावेळी संविधान आणि येणारी परिस्थिती तसेच त्यावरील उपाय यावर उहापोह करणारे भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून, ही महासभा देशातील संविधान प्रेमी जनतेला एक नवीन दिशा देणारी सभा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावे असा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीत झाला आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रण पाठवणार आहोत, असे आंबेडकर यांनी नमूद केले.
हेही वाचा : मराठा-ओबीसी म्हणजे इंडिया- पाकिस्तानचे लोक नाहीत; संभाजीराजे छत्रपतींची भूमिका
भाजप, संघ आंबेडकरांच्या रडारवर
2024 च्या लोकसभा निवडणुका या विकास, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्द्यांवर लढवल्या जातील. मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा असा आहे की, इथे आमची व्यवस्था हवी आहे. यातील ‘आमची’ हा शब्द फसवा आहे. ते वैदिक व्यवस्था मानतात. त्यांच्या व्यवस्थेत बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही, अशा शब्दांत आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला वैदिक धर्मावर आधारित संविधान हवे आहे. परंतु, आताचे भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.