कायद्यातील निष्णात असलेले अध्यक्ष कायदेमंडळाला मिळाले – देवेंद्र फडणवीस

rahul narvekar is the youngest assembly speaker in the history of the country devendra fadanavis

महाराष्ट्राच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाला आणखी एक मोठा विजय मिळाला आहे. यावेळी झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर 64 मतांनी विजयी झाले आहेत. राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष पदावर निवड झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले. यावेळी सभागृहात कायदेमंडळाला कायद्यातील निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले असं वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला असून महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरूण अध्यक्ष आहेतच, पण देशाचाही इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष मिळाला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधिमंडळात आता सासरे आणि जावई यांचे वर्चस्व आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणात म्हणाले की, विधानसभेच्या अध्यक्ष स्थानाला विशेष महत्त्व आहे. हे कायदेमंडळ आहे. याठिकाणी आपण कायदे करतो, विशेषत: आपल्या विधीमंडळाची रचना अशी की, गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की अगदी कुठल्या कर्नाटक किंवा गोव्याच्या सीमेवरचा माणूस असो प्रत्येकाचा विचार त्या आशा, आकांशा, अपेक्षा या सभागृहाच्या माध्यामातून प्रतिध्वनीत होतात आणि छोट्यातला छोटा प्रश्न देखील सोडवण्याची क्षमता आणि मोठ्यातली मोठी अडचण देखील सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे. म्हणून या सभागृहाचे अध्यक्ष होणं ही देखील अत्यंत भाग्याचा योग आहे तो राहुल नार्वेकर यांना लाभला त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.”

खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. खरंतर हे एक कठीण काम आहे. ज्याच्या बाजूने निर्यण येतो त्याला तो न्याय वाटतो,. ज्याच्याविरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो, पण शेवटी अनेक वेळा आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. पण असं नसतं, एक त्यांची बाजू असते, एक आमची बाजू असते. एक तुमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते जी खरी बाजू असते. ती सत्य बाजू सांगण्याचे काम अध्यक्षांना करावा लागतो.

राहुल नार्वेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली य़ाचा आनंद आहे. एक तरुण सहकारी म्हणून सभागृहातील तुमचं काम मी पाहिलं, वरचं सभागृह असेल खालचं सभागृह असेल उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेल काम आणि विशेषत: कायद्यात निश्चितपणे काय आहे हे समजून घेऊन न्यायालयाच्या कसोटीवरही आपला कायदा टीकला पाहिजे, यासाठीचे चपखल निरिक्षण क्षमता सातत्याने करत होता. या कायदेमंडळाला कायद्या निष्णात असलेले अशाप्रकारचे अध्यक्ष मिळाले आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष कायदे पंडित नसतीलही पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे काम या आसनावरून केले आहे, त्याचे स्मरण करून अभिनंदन करणं महत्त्वाचे आहे.

 


फडणवीसांनी वरील सभागृहातील राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की,  विधान परिषदेचा हा योगायोग आहे की, वरच्या सभागृहातील सभापती आणि खालचे अध्यक्ष यांच नातं सासरे आणि जावयाचं आहे. यावेळी पुल देशपांडेंच्या वाक्याला उजाळा देत फडणवीस म्हणाले की, सासरे आणि जावयाचं एकमत होणं कठीण आहे. पु.ल देशपांडे जावयाचा उल्लेख असा करतात की, जावयी म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह आहे. यावेळी सभागृहात एकचं हशा पिकला.

फडणवीस त्यानंतर पुढे म्हणाले की, एक योग्य प्रकारचा व्यक्ती अध्यक्षस्थानी बसला आहे. नार्वेकर कुटुंब मुळचे सावंतवाडीचे त्यांचा गोव्यातही वास्तव्य राहिला आहे. पण अनेक वर्षांपासून मुंबईकर आहेत. विशेषत: राष्ट्रीय विचारांना जीवनात प्रथम स्थान देणारं अशाप्रकारचं कुटुंब आहे. आपले वडील अपक्ष नगरसेवक म्हणून निवडणूक येत होते. त्यांनी अनेक लोकहिताची कामं त्यांच्या कार्यकाळात केली, आणि समाजकारणाचा वारसा आपल्याला वडीलांकडून मिळाला, आपण प्रतिनिधीत्व करत असलेला मतदार संघ एकीकडे कोळी बांधवांचे वास्तव्य असलेला मतदार संघ आहे आणि दुसरीकडे समाजातील अतिशय उच्चभ्रू वर्गाचे वास्तव्य असलेला मतदार संघ आहे, प्रत्येक समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी आपला जो जिव्हाळ्याचा संबंध आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. यात कोळीबांधवांच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजना अतिशय पथदर्शी आहे.

राहुल नार्वेकरांनी गेल्या १५ वर्षांपासून न्यायालयात वकीली केली, आता कोर्टात वकीली करण्यावर आपल्य़ावर बंधन येईल, कारण हे संविधानिक पद आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे वाटा तुम्ही याठिकाणी देणार आहात. या कायदेमंडळात योग्य कायदे झाले पाहिजे, योग्य निर्मय झाले पाहिजेत देश हित समाज हित लक्षात ठेवून कार्य झालं पहिजे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च ठेवून निर्णय झाले पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग नक्कीच शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला यांसर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


…आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या