बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रण – राहुल नार्वेकर

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या विधी मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्यात आले असून या तैलचित्राच्या उद्घाघाटन कार्यक्रमाला सर्व ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रित केले आहे. देशाची महाराष्ट्राची अभूतपूर्व अशी सेवा बाळासाहेबांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे परिवार बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा बोलून दाखवली.

नवी मुंबई फेस्ट-२०२३ या राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन सीबीडी बेलापूर येथील दि पार्क हॉटेलमध्ये विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मागील अधिवेशनात विधी मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी तैलचित्र उभारण्याची मागणी आपण स्वत: निवेदनाद्वारे केल्याचे नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्याचा निर्णय घेतला होता.

येत्या २३ जानेवारीला या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या तैलचित्रामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील आशा पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी केंद्र व राज्यातील मंत्री, कॅबीनेट मंत्री, खासदार, आमदार त्याचप्रमाणे बाळासाहेबांसोबत काम केलेल्या व्यक्ती, त्यांचे चाहते कलाकार, समाजातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्या बरोबरच ठाकरे परिवाराला देखील आमंत्रित केले आहे. बाळासाहेबांना तमाम महाराष्ट्रवासियांतर्फे तैलचित्रातून आदरांजली देणारा हा कार्यक्रम असणार असून प्रत्येक आमंत्रित सदस्य बाळासाहेबांना आदर राखण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगत ठाकरे परिवाराला एक प्रकारे आमंत्रित सदस्य म्हणून तरी उपस्थित राहण्याचा सल्ला नार्वेकर यांनी दिला असल्याचे स्पष्ट केले.


हेही वाचा : सरकारचं काऊंटडाऊन सुरू, शिवजयंती पूर्वीच..; अमोल मिटकरींचं भाकीत