गुढीपाडव्याला देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी; राहुल शेवाळेंचे केंद्र सरकारला पत्र

नवी दिल्लीः ‘गुढीपाडवा’ सणानिमित्त ज्याप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी देण्यात येते. अशाच प्रकारे संपूर्ण देशातही गुढीपाडव्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

‘गुढीपाडवा’ हा सण हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून मुंबई, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. मुंबई, पुणे आदी ठिकाणी तर गुढीपाडव्याला तरुण, तरुणी पारंपारिक वेशभूषा करून मिरवणुका काढतात. तरुण पिढी ‘गुढीपाडवा’ सण मोठ्या जल्लोषात, उत्साहात साजरा करते. ठिकठिकाणी शोभा यात्रा काढल्या जातात.

या गुढीपाडव्याला मुंबईसह महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. त्याप्रमाणे यापुढे देशात ‘गुढीपाडवा’ हा हा सण ‘हिंदू नववर्ष दिन’ या एकाच नावाने साजरा केला जावा. या दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र खासदार शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

संपूर्ण देशात बहुसंख्य हिंदू लोक गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करतात. त्यामुळे गुढीपाडवा सणाला केंद्र सरकारने, सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी पत्रात केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांची मागणी मान्य होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुढीपाडव्याला कोरोना लसीकरण बंद
गुढीपाडव्याला मंत्रालय, सरकारी, महापालिका कार्यालये यांना सार्वजनिक सुट्टी असल्याने ते बंद असणार आहेत. त्यामुळे या दिवशी ‘कोरोना लसीकरण’ केंद्रही बंद असणार आहे. परिणामी कोरोना लसीकरण सेवा बंद राहणार आहे.
याबाबतची माहिती मुंबई महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ मार्च २०२३ पासून कोरोना लसीकरण केंद्र व लसीकरण पूर्ववत सुरू राहील, असे पालिकेने सांगितले आहे. मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी व मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.