घरदेश-विदेशराहुल शेवाळे यांची नियुक्ती १८ जुलैला

राहुल शेवाळे यांची नियुक्ती १८ जुलैला

Subscribe

लोकसभा सचिवालयाचा निर्णय संशयास्पद, शिवसेनेचा आरोप

शिंदे गटाच्या खासदारांनी १९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना नव्या गटनेत्याच्या नियुक्तीचे पत्र दिले, मात्र लोकसभा सचिवालयाने त्याआधीच जाहीर केलेल्या गटनेत्यांच्या यादीत राहुल शेवाळे यांच्या नावाचा समावेश होता. याचाच अर्थ लोकसभेत शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आधीच म्हणजे १८ जुलै रोजीच घेण्यात आला होता. लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय संशयास्पद आहे, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी केला. सोबतच शिवसेना पक्षप्रमुखांनी नियुक्त केलेला लोकसभेतील शिवसेनेचा गटनेता मीच असून आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी एकत्र येत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड केली आहे, पण आम्ही ६ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाजमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर १९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्रसुद्धा दिले होते, मात्र त्यांनी आमच्या पत्राची दखल न घेता लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता नैसर्गिक न्यायाचे तत्त्व न पाळता निर्णय घेतल्याचेही राऊत यांनी म्हटले. लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. पक्षाचे प्रमुख गटनेतेपदाची निवड करतात. त्यासाठीचे पत्रही दिले जाते. माझ्या निवडीचेही पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.

तो उठाव किंवा बंड नव्हताच, ती गद्दारीच होती – आदित्य ठाकरे 

ते सांगतात की आम्ही उठाव केला, आम्ही बंड केले, परंतु तो उठाव किंवा बंड नव्हताच मुळात. ती गद्दारी होती आणि गद्दार म्हणूनच ते माथ्यावर शिक्का घेऊन फिरणार आहेत. बंड आणि उठाव करायला हिंमत लागते, ताकद लागते, असा टोला युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना लगावला. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात शिवसंवाद यात्रा काढली. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ठाण्यात आल्यानंतर सगळे आम्हाला येऊन भेटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आहोत. कारण उद्धव ठाकरे सच्चा माणूस आहे. बंड करायचा असता तर गुवाहाटीला पळून गेले नसते. तिकडच्या तिकडे उभे राहिले असते. सुरतेला पळून गेले नसते. बंड करणार्‍यांना उद्धव ठाकरेंसमोर येऊन सांगण्याची हिंमत झाली नाही. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे २४ तास खुले आहेत. सध्या राज्यात जे सुरू आहे ते बरे नाही. राज्यात फक्त दोन लोकांचे मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच हे लिहून घ्या. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते. उद्धव ठाकरे भेटत नव्हते, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. उद्धव ठाकरे आजारी असतानाच बंडखोरांनी बंडाची तयारी सुरू केली होती. त्यांना वाटले आता उद्धव ठाकरे परत उठणार नाहीत, पण उद्धव ठाकरे आजारी असतानाही मंत्रिमंडळाच्या बैठका घेत होते. बेडवरूनही ते काम करीत होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -