Homeमहाराष्ट्रकोकणRaigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद, कोण आहे अफजलखान, वाघ आणि कोण...

Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद, कोण आहे अफजलखान, वाघ आणि कोण आहेत कोल्हे

Subscribe

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे यांच्यातील वाद संपता संपत नाही. आता तर अफजलखान, वाघ अन कोल्हे इतपर्यंत टीका होऊ लागल्याने पालकमंत्रिपद शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी किती प्रतिष्ठेचे केले आहे, याची खात्री पटते. जो स्वत:च्या भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार, अशी जहरी टीका तीन दिवसांपूर्वी रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी पालीमधील कार्यक्रमात सुनील तटकरेंवर केली होती. त्यानंतर खालच्या पातळीवरून आमच्यावर टीका केलीत तर त्या पातळीवर येऊन तुम्हाला उत्तर देऊ, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या अॅड. सायली दळवी-जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे रायगडमधील पालकमंत्रिपदाचा वाद आणखी किती काळ चालणार, असा प्रश्न आता रायगडची जनता विचारू लागली आहे.

हेही वाचा…  Ladki Bahin : प्रजासत्ताक दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे?

पालीमधील कार्यक्रमात, जो भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार, अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर केली होती. एवढेच नाही तर हिंमत असेल तर बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला, असे थेट आव्हान गोगावले यांनी तटकरे यांना दिले. त्यानंतर पुन्हा एकदा गोगावले विरुद्ध तटकरे यांच्या जोरदार जुंपली आहे. यावर अफझलखान कोण आणि शिवरायांच्या विचारांवर चालणारे तसेच रायगडचा विकास करणारे नेतृत्व कोण हे रायगडच्या जनतेला माहीत आहे, असे प्रत्युत्तर अॅड. सायली दळवी-जाधव यांनी गोगावले, दळवी आणि थोरवे या तिन्ही आमदारांना दिले आहे.

ज्या पालकमंत्रिपदासाठी तुमची रडारड सुरू आहे, ते पालकमंत्रिपद सुनील तटकरे यांनी अनेकदा भूषवले आहे, ते राज्याचे अर्थमंत्रीदेखील होते. तटकरे हे जिल्ह्यापुरते नाही तर राज्याचे नेतृत्व करणारे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तटकरे हे त्यांच्यामुळे निवडून आले आहेत, अशा अविर्भावात असलेल्यांना सांगायचे आहे की, सुनील तटकरे यापूर्वीही अनेकदा निवडून आले आहेत. मात्र, ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले त्यांनाच तुम्ही पालकमंत्रिपदासाठी वेठीस धरण्याचे काम केले आहे. महामार्ग अडवून, जाळपोळ केली आहे, असा हल्लाबोल अॅड. सायली यांनी केला आहे. तसेच रयतेला वेठीस धरण्याचे काम छत्रपतींचा मावळा करतो की गनीम करतो, हे रायगडच्या जनतेला चांगलेच ठावूक आहे, या शब्दांत त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव घेऊन समाचार घेतला.

हेही वाचा…  Ncp Vs gogawale : महायुतीत वाद! गोगावलेंनी आपली उंची पाहून बोलावे, अजितदादांच्या नेत्यानं फटकारलं

यापुढे सुनील तटकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केलीत तर तुमच्याच पातळीवर येऊन तुम्हाला उत्तर देऊ. महायुतीचा धर्म म्हणून शांत आहोत. मात्र, यापुढे शांत बसणार नाही आणि टीका करणाऱ्यांची मुळीच गय करणार नाही, असा इशारा अॅड. सायली दळवी-जाधव यांनी दिला आहे. त्याचवेळी कोल्ह्याने वाघाचे कातडे कितीही पांघरले तरी वाघ हा वाघच असतो आणि कोल्हा हा कोल्हाच असतो, अशी टीका शिवसेनेच्या भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या आमदारांवर त्यांनी केली.

(Edited by Avinash Chandane)