रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महापरिनिर्वाणदिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने येत्या रविवारी तिन्ही मार्गांवरील मेगा ब्लॉक (Mumbai Mega Block ) नसणार असे जाहीर केले आहे. मुंबईत दर रविवारी रेल्वे ट्रकची देखभाल, दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो, यात गेल्या आठवड्यात कर्नाक ब्रीज पाडकामासाठी सेंट्रल मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र येत्या रविवारी मुंबईकरांची मेगाब्लॉकमधून सुटका झाली आहे. त्यामुळे रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयामुळे 4 डिसेंबर रोजी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चौपटीवरील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. दोन दिवस आधीदीपासूनच हजारो अनुयायी शिवाजी पार्क परिसरात येऊन राहतात. त्यामुळे या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि सर्व सार्वजनिक वाहतूक यंत्रणा प्रयत्नशील आहेत. यामुळे मुंबईत 5 ते 7 डिसेंबरदरम्यान बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यात लोकल फेऱ्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे, यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेने 4 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
दरम्यान हार्बर व सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक नसला तरी पश्चिम रेल्वेकडून 3 डिसेंबर रोजी सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत असेल. मात्र सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट प्रशासनाने मुंबई आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानकावरून शिवाजी पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता ‘चैत्यभूमी फेरी’ या नावाने अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यात महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे मुंबई शहरातील या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवण्यासाठी 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर रोजी मोफत बस फेरीचे आयोजन केले आहे. याला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ असं नाव देण्यात आलं आहे. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत बस फेरीत दरम्यान दादर (पश्चिम) येथील चैत्यभूमी, दादर (पूर्व) भागातले डॉ. बाबासाहेबांचे राजगृह हे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळ येथील बीआयटी चाळ आणि दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल, या मोफत बस फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथे एकत्र जमायचे आहे. पर्यटकांना बसने चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल.