देशभरातील रेल्वेसेवा आजपासून बंद; मुंबईकरांची लाईफ लाईनही राहणार ठप्प

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातील रेल्वेसेवा आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेताल आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील रेल्वेसेवा आज, मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे. ही प्रवासी वाहतूक सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. तसेच आता या पाठोपाठ मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे.

करोना विषाणूचा पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत भारतील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनी घेतला आहे. ज्यात मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर, उपनगरीय लोकल सेवा आणि मेट्रोचा समावेश आहे.

देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असून ती ३४७ वर जाऊन पोहचली आहे. तसेच आतापर्यंत भारतीय रेल्वेत शनिवारी ‘अगस्त क्रांती एक्सप्रेस’मध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले होते. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आतापर्यंत ६० पेक्षा जास्त होम कॉरन्टाईन प्रवाशांना उतरवण्यात आले होते. त्यामुळे जलद गतीने पसरणाऱ्या करोना संसर्ग रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हा मोठा निर्णय घेतला.

३१ मार्च पर्यत लोकल सेवा बंद

मुंबई महानगर परिसरातील मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या लोकलची गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणारे लोक वगळता, सामान्य प्रवाशांच्या प्रवासास बंदी घालण्यात निर्देश शनिवारी कोंकण विभागाचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिले होते. मात्र, आता रेल्वे बोर्डाचा निर्णयानंतर तिन्ही रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा ३१ मार्चपर्यंत लोकल सेवा बंद असणार आहे.

ट्विटरच्या माध्यमातून देणार माहिती

लोकलसेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत पुढील माहिती ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करु नका, असे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona Update : ३१ मार्चपर्यंत लोकल सेवाही राहणार बंद