Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पावसाचा घातवार! मुंबईत दरड कोसळून २९ जणांचा मृत्यू

पावसाचा घातवार! मुंबईत दरड कोसळून २९ जणांचा मृत्यू

दुर्घटनांमध्ये ४ जखमी, मृतांच्या नातेवाईकांना ७ लाखांची मदत जाहीर

Related Story

- Advertisement -

मुंबईत शनिवारी रात्री कोसळणार्‍या मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला. मुंबईकर झोपेत असताना पावसाने मोठा घाला घातला. पूर्व उपनगरात – ४ तर पश्चिम उपनगरात – ७ ठिकाणी दरड, घरांची पडझड झाली. चेंबूर, भांडुप व विक्रोळी अशा तीन ठिकाणी दरड, भिंत व घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेत २9 जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत.

चेंबूर, भारत नगर येथे घरावर संरक्षक भिंत, दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. आणखीन चौघांचा शोध ढिगार्‍याखाली सुरू आहे. तर विक्रोळी, सुर्यनगर येथे घरांवर दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. तसेच, भांडुप येथेही घरांची पडझड होऊन सोहम महादेव थोरात (१६) या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. त्याचप्रमाणे पवई, चांदीवली येथे दरड कोसळून २ जण जखमी झाले आहेत. सदर दुर्घटनांच्या ठिकाणी उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे व बचावकार्य, शोधकार्य सुरू होते. या दुर्घटनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींवर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत आहेत.

चेंबूर येथे १८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

वाशी नाका, चेंबूर, न्यू भारत नगर, वांझार दांडा, माहुल येथे मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास नागरिक झोपेत असताना डोंगरभागातील दरड व संरक्षक भिंत अचानकपणे ४ -५ घरांवर कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या १८ जणांमध्ये ८ महिला, ५ पुरुष तर २ लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. तर २ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

विक्रोळी येथे दरड, घर पडझडीत ५ जणांचा बळी

विक्रोळी (प.), सुर्यनगर येथे डोंगराळ भागात मध्यरात्री २.४० वाजताच्या सुमारास नागरिक झोपेत असताना ६ घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल व वार्डातील कामगार यांच्यामार्फत ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्याने घटनास्थळी वाहनाने जाण्यात अडचण होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पालिका यंत्रणेला ढिगारा उपसण्याच्या कामात मोठी मदत केली.

भांडुप येथे घराच्या पडझडीत मुलाचा मृत्यू

- Advertisement -

कोंबडगल्ली, अमरकुल विद्यालयाजवळ एका चाळीत पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास रहिवाशी झोपेत असताना घराच्या भिंतीचा भाग पडला. या दुर्घटनेत सोहम महादेव थोरात (१६) ह्या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला नजीकच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरड कोसळून जीवितहानी होण्याच्या घटना दु:खद आहेत. मुंबई महापालिका दरवर्षी डोंगराळ भागात, धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या, धोकादायक संरक्षक भिंतीजवळ राहणार्‍या नागरिकांना दुर्घटना होण्याची व त्यात जीवित, वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच नोटिसा बजावून धोक्याचा पूर्व इशारा देते. तशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नागरिकांनी आपले राहते घर खाली केले नाही. – किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई.

चेंबूर येथे ज्या भागात ही दुर्घटना घडली तेथील २०-२५ कुटुंबियांना धोकादायक भागातून सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन २०० कुटुंबांना तात्काळ जागा खाली करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. – इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका.

फक्त पाच तासांत सर्वाधिक पाऊस

दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळी आणि किल्ला परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर असणार्‍या स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये अंदाज नोंदविण्यात आला. तब्बल २०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. साधारणपणे ५ तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणार्‍या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.

मुंबईत भरपावसात पाणीबाणी

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. आभाळातून पाणी कोसळत असताना मुंबईकरांच्या घरातील नळ मात्र कोरडे होते. सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण मुंबईत कुठेही पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लोकल ठप्प

मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेलाही बसला. कोरोनामुळे सर्वसामान्यांना दुरापास्त झालेली मुंबईतील लोकल सेवा सकाळपासून ठप्प झाली होती. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल गाड्या जागीच उभ्या होत्या. मुंबईतील अनेक रस्त्यांबरोबरच रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. तर सायनसह अनेक रेल्वे स्थानकांवरही प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुंबईकडे येणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणार्‍या या गाड्या आता दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, दिवा आदी रेल्वे स्थानकांपर्यंत येणार आहेत.

बेस्टची वाहतूक वळवली

मुसळधार पावसामुळे ३७ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने २४ बस गाड्यांची वाहतूक बंद पडली. त्यामुळे बेस्ट बसगाड्यांची वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. परळ येथे गुडघाभर पाण्यात बेस्टची बस बंद पडल्याने प्रवाशांना बंद बसमधून खाली उतरून भिजलेल्या कपड्यांसह साचलेल्या पाण्यामधून कसेबसे मार्ग काढीत पर्यायी वाहतुकीचा आश्रय घेऊन मार्गस्थ व्हावे लागले.

घरात शिरले पाणी

कांदिवली, परळ, गोरेगाव आदि सखल भागातील झोपडपट्टीत घराघरात पावसाचे पाणी शिरले तर चेंबूर व अन्यत्रच्या काही सोसायटिंच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. परिणामी वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांना त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच, घरातील लाकडी सामान, कपाट, कपडे, इतर वस्तू पावसाच्या पाण्यात भिजल्याने त्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

- Advertisement -