मुंबईत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

मुंबईसह महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनाम्यानंतर बुधवारपासून राजकारण चांगलेच तापलेले असताना मुसळधार पावसाने शहर व उपनगरात चांगलीच बरसात केली. त्यामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. शहर भागात चार ठिकाणी इमारती व घरांचा भाग पडण्याच्या आणि उपनगरात १० ठिकाणी झाडे/ फांद्या पडण्याच्या दुर्घटना घडल्या. तर, शहर व उपनगरात ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व दुर्घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर व मुंबईकरांच्या जनजीवनावर थोडासा परिणाम झाला.

मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्रीपासून शहर व उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अगदी गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत तरी पावसाची रिपरिप सुरूच होती. २९ जून रोजी सकाळी ८ ते ३० जून रोजी सकाळी ८ या २४ तासांत मुंबई शहर भागात ३३.२ मिमी तर उपनगरे भागात ४१.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, ३० जून सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत शहर भागात सर्वत जास्त म्हणजे ११९.०९ मिमी , पूर्व उपनगर भागात – ५८.४० मिमी आणि पश्चिम उपनगर भागात ७८.६९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कुठे किती पाऊस ?

शहर भागात -: मलबार हिल परिसरात सर्वात जास्त १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, ग्रँट रोड – ८७ मिमी, भायखळा, मुंबई सेंट्रल – ८२ मिमी, दादर -९५ मिमी, चंदनवाडी – ९८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगर -: मुलुंड परिसरात ५८ मिमी, कुर्ला – ५२ मिमी, घाटकोपर – ४६ मिमी, चेंबूर – ४३।मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम उपनगर -: वांद्रे परिसरात – ८२ मिमी, वर्सोवा – ६४ मिमी, अंधेरी ( पूर्व) – ६० मिमी, सांताक्रूझ – ५८ मिमी आणि विलेपार्ले – ५७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अंधेरी सब वे आदी सखल भागात साचले पाणी

मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे काही अवधीत निचरा केला.

शहर भागात ४ ठिकाणी इमारती, घरे कोसळण्याच्या दुर्घटना

मुंबईत रात्रीपासून पावसाची बरसात सुरू असताना काळबादेवी, बदामवाडी या ठिकाणी म्हाडाच्या तळमजला अधिक चार मजली इमारतीचा भाग कोसळण्याची दुर्घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत ७०- ८० नागरिक बचावले. तर सायन, हरी मस्जिद, गुरुनानक शाळेजवळ, तळमजला अधिक ५ मजली रिकाम्या इमारतीचा ( क्रमांक १५) काही भाग गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. तसेच, शहर भागात आणखीन दोन ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

शॉर्टसर्किटच्या ८ घटना : 

मुंबईत मुसळधार पावसात शहर भागात ४ ठिकाणी , पूर्व उपनगरात – ३ ठिकाणी व पश्चिम उपनगरात -१ अशा ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

झाडे/ फांद्या पडण्याच्या १० घटना

बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा असज दिवसभर जोर होता. या पावसात उपनगरे भागात १० ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये, उपनगरे भागातील पूर्व उपनगरात ३ ठिकाणी तर पश्चिम उपनगरे भागात ७ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मात्र या घटनांत कोणीही जखमी झाले नाही.


हेही वाचा : रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय