मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांची खरीपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात नेमक्या पावसाला पुन्हा कधी सुरुवात होणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या पावसाला पुरत हवामान नसल्याने पाऊस आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ खुळे यांनी सांगितले आहे. परंतु मुंबईकरांसाठी मात्र त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. (Farmers worried due to lack of rain)
हेही वाचा – यंदाही मंडप भाडे माफ, ठामपा क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गुड न्यूज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा उकाडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक पावसाची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यामुळे आता पावसाच्या अभावामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. परंतु, हवामान विभागाकडून मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता 6 सप्टेंबर तरी राज्यातील मुंबई आणि कोकणात पावसाच्या तुरळक सरी बरसणार असून इतर भागांमध्ये 7 सप्टेंबरनंतर हवामानाच्या स्थितीवर पाऊस पडणार की नाही हे अवलंबून असल्याचे सांगण्यात आले आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या एल निनोच्या मोठा प्रभावामुळे कमी पाऊस पडत आहे. 1 सप्टेंबरनंतर केव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका ह्याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा ह्या चार नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? असे हवामान तज्ज्ञ खुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अल नीनो वादळामुळे मागील तीन महिने चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? असेही खुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पावसाने गेल्या महिन्याभरापासून दडी मारल्याने आता खरीपाची पिके ही धोक्यात आलेली आहेत. तर काही भागांतील पिके ही जळण्यास सुरुवात झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके वाचविता यावी यासाठी शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आबे. खरीपाच्या हंगामात पावसाची झालेली अवस्था पाहता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिके लावताना नीट विचार करावा, असा सल्ला खुळे यांच्याकडून देण्यात आला आहे.