मुंबईत मळभ, ठाण्यात तुरळक सरी, विरारमध्ये गडगडाट; तुमच्या शहराची स्थिती काय?

Unseasonal Rain | सातारा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने काही काळ विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात आला होता. अडीच ते तीन तासांनंतर पावसाचा जोर कमी झाला. तर, पुण्यातही शिवाजीनगर, कसबा पेठेत पावसाने हजेरी लावली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

Unseasonal Rain | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान सातत्याने बदलत (Weather Update) आहेत. कधी कडक ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून मुंबईत मळभ आले असून रात्री ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तुरळक सरी कोसळल्या. तर, आज सकाळपासून विरारसह आजूबाजूच्या परिसरात विजांचा गडगडाट झाला. त्यामुळे राज्यावर आता पुन्हा अस्मानी संकट घोंघावत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ठाण्यापुढील परिसरात आणि मुंबईतील दहिसर, बोरिवलीत काल रात्रीपासूनच तुरळक सरी कोसळत होत्या. आज सकाळपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नियमित कामाला जाणाऱ्या नोकरदारवर्गाची तारांबळ उडाली आहे.

ठाण्यात तुरळक सरी

ठाण्यात काल दुपारी उष्णता वाढली होती. परंतु, सायंकाळी तापमानात घट झाली. रात्री नऊच्या सुमारास ठाण्यातील दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथे तुरळक सरी कोसळल्या.

राज्यात कुठे कुठे पाऊस

सातारा, पुणे, धुळे, वर्धा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पीकांना फटका बसण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्याने काही काळ विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात आला होता. अडीच ते तीन तासांनंतर पावसाचा जोर कमी झाला. तर, पुण्यातही शिवाजीनगर, कसबा पेठेत पावसाने हजेरी लावली होती.

राज्यात १५ ते १८ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कांदा, गहू, हरभरा पिकांची काढणी सुरू आहे. परंतु, हवामानातील बदलांमुळे शेतीपिकांना फटका बसला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, विरारसह अनेक भागात वीजांच्या गडगडाटसह तुरळक सरी कोसळल्या. येत्या काही दिवसांत मराठवाड्यासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर, मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित मराठवाडा, विदर्भात पावसाची अधिक शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात गारठा होता. मात्र, दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील तापमानात वाढ होत गेली. राज्यातील तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. फाल्गुनातच वैषाख वणवा पेटल्याने एप्रिल-मे महिन्याबाबत चिंता व्यक्त केली गेली. त्यातच, आजा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने तापमानात किंचित घट झाली आहे. परंतु, येत्या काळात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.