Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Rain Update heavy rain forecasts with thunderstorms in some districts in next 2 3 hours information by imd mumbai
Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बंगाल उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अशातच पुढील काही तासांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशा संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवमान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, मुंबई उपनगरासह नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादमधील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊसाच्या सरी कोसळणार आहेत. तर पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती कायम रहाणार असून त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.